Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. एकीकडे 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे मात्र अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली आहे. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अटकेपूर्वीचा अल्लू अर्जुनचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत पुष्पाचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. पोलीस अटक करायला आलेले असताना अल्लू अर्जुन कॉफी पित उभा असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर पत्नीला किस करत अभिनेता स्वत:च पोलिसांच्या गाडीत जाऊन बसल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. यावेळी अल्लू अर्जुनने "फ्लावर नही, फायर है मे" असं लिहिलेलं टीशर्ट घातल्याचं दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुनची साऊथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यातच त्याच्या 'पुष्पा' सिनेमाचा भलामोठा चाहतावर्ग आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' रिलीज झाला. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. यावेळी एक दुर्घटना घडली. दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला उपस्थित होती. प्रिमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झालं. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.