आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांचा एकूणच आवाका पाहता, मराठी चित्रपटसृष्टी त्यापासून बऱ्यापैकी अलिप्त राहात होती. भव्यदिव्य स्वरूप हे तिथल्या चित्रपटांचे वैशिष्ट्य, मराठी चित्रपटांच्या फारसे अंगवळणी काही पडले नाही. मराठी चित्रपट आशयघनतेच्या पायावर पक्का उभा राहिला, पण अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांनी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर थेट आॅस्करच्या नामांकनापर्यंत मजल मारली. साहजिकच मराठीचा दबदबा संपूर्ण देशात वाढला. आता याची दखल दक्षिणात्य चित्रपटसृष्टीनेही घ्यायला सुरुवात केली आहे. निदान बॉलीवूड अभिनेता मुकेश ऋषी यांचे निरीक्षण तर हेच स्पष्ट करते.दक्षिणेतले काही कलाकार मराठीत पाय रोवू लागले असताना, काही दाक्षिणात्य मंडळींनी एकत्र येत, 'वीरात वीर मराठा' नामक मराठी चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूक कार्यक्रमात मुकेश ऋषी यांनी याबाबत स्पष्ट मत मांडले. मराठी चित्रपट आज मोठ्या उंचीवर पोहोचला आहे आणि त्याने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचेही लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिणेतले काही कलाकार मराठीत येत आहेतच, परंतु मराठीत कोणता चित्रपट बनतोय, याकडे दाक्षिणात्य चित्रपटकर्त्यांचे लक्ष कायम लागून राहिलेले असते असे सांगत, त्यांनी मराठी चित्रपटांच्या आशयघनतेबद्दलही गौरवोद्गार काढले.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे मराठीकडे लक्ष!
By admin | Updated: October 16, 2015 02:10 IST