Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही वर्षांनंतर तुला कळेल...! आलियाच्या आईने झायरा वसीमला दिला सबुरीचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:28 IST

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ठळक मुद्देअनुपम खेर यांनी झायराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, एका 16-17 वर्षांच्या मुलीने असा निर्णय घेणे, दुर्दैवी असल्याचे म्हटले होते.

सलग दोन ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. झायराच्या या निर्णयावरच्या प्रतिक्रिया अद्यापही थांबलेल्या नाहीत. काहींनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायराला ट्रोल केले आहे. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.‘जे तुम्हाला मनापासून आवडते, परमेश्वरही तुम्हाला तेच देऊ इच्छितो, हे काही वर्षांनंतर झायराला कळेल, अशी मला आशा आहे. अभिनय म्हणजे स्वत: स्वत:ला भेटणे. याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या भावभावना लोकांपर्यंत पोहोचवता. हे एक महान काम आहे,’असे त्यांनी लिहिले आहे. पुढे त्या लिहितात, ‘मी झायराच्या निर्णयाचा आदर करते. पण झायरा, तू सध्या खूप लहान आहेत. कदाचित पुढच्या चार वर्षांत तुझे विचार बदललेले असतील. तू परत आलीच तर आम्ही मोकळ्या मनाने तुझे स्वागत करू.’

सोनी राजदान यांच्याआधी अनेकांनी झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण यातील रवीना टंडनच्या प्रतिक्रियेची सर्वाधिक चर्चा झाली होती. ‘ज्या इंडस्ट्रीने तिला भरभरून दिले, त्या केवळ दोन चित्रपटांत झळकलेल्या व्यक्तिने कृतज्ञता न बाळगल्यास काहीही फरक पडत नाही. तिने तिची प्रतिगामी विचार स्वत:जवळ ठेवावेत आणि सन्मानपूर्वक बाहेरचा रस्ता धरावा,’ असे  ट्वीट रवीनाने केले होते.

अनुपम खेर यांनी झायराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, एका 16-17 वर्षांच्या मुलीने असा निर्णय घेणे, दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. याऊलट बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्य, अभिनेता कमाल आर खान आदींनी हा झायराचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :झायरा वसीमआलिया भट