Join us

सोनम कपूरने नाकारली दहीहंडीची कोट्यावधींची ऑफर ?

By admin | Updated: August 25, 2015 09:57 IST

दहीहंडीसारख्या सणांना आता ग्लॅमर प्राप्त झाले असून दहीहंडीच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटीही खटाटोप करताना दिसतात. अभिनेत्री सोनम कपूर याला अपवाद ठरली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - दहीहंडीसारख्या सणांना आता ग्लॅमर प्राप्त झाले असून दहीहंडीच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटीही खटाटोप करताना दिसतात. अभिनेत्री सोनम कपूर याला अपवाद ठरली असून दहीहंडीत होणा-या अपघातांमुळे दहीहंडी उत्सवांना हजेरी लावणार नाही अशी भूमिका सोनम कपूरने घेतली आहे. विशेष बाब म्हणजे सोनमला एका दहीहंडी उत्सवात हजर राहण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपयांची ऑफरही आली होती पण सोनमने नम्रपणे ही ऑफर नाकारल्याचे समजते. 
दहीहंडीची वाढणारी उंची, थरांच्या विक्रमाची स्पर्धा यामुळे दहीहंडी हा चर्चेचा विषय असतो. दहीहंडीला मिळणारी लोकप्रियता बघून मोठमोठ सेलिब्रिटीही या उत्सवात सहभागी होण्यास उत्सुक असतात. यासाठी आयोजकही कलाकारांना कोट्यावधी रुपये देण्यास तयार असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरला मुंबईतील आयोजकाने दहीहंडी उत्सवात १० मिनीटांसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. यासाठी सोनमला तब्बल सव्वा कोटी रुपये देण्याची तयारीही या आयोजकाने दर्शवली होती. मात्र सोनम कपूरने ही ऑफर नाकारली. 
सोनम कपूरच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार दहीहंडीत होणारे अपघात, या उत्सवात जायबंदी होणारे गोविंदा या विषयी सोनम कपूरला माहिती होती. या अपघातांमुळे दहीहंडी उत्सव असुरक्षित बनल्याची भावना तिच्या मनात होती व म्हणून सोनमने ही ऑफर नाकारली अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. सोनमने या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.