Join us  

'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत सोनाली कुलकर्णीने दिला बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:07 PM

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला.

>>विश्वास मोरे

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर...'' या अशा जयघोष करत प्राधिकरणातील गणेश तलाव येथे गुरुवारी कृत्रिम हौदामध्ये गणरायाचे विसर्जन केले. पिंपरी- चिंचवड शहर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेश मंडळांनी गुरुवारी सकाळपासूनच विसर्जनाची सुरुवात केली आहे. चिंचवड परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन पवना नदी घाटावर तर प्राधिकरण आकुर्डी परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन आकुर्डीतील गणेश तलाव परिसरात करण्यात येत आहे.

गणेश तलाव परिसरामध्ये कृत्रिम हौद तयार करण्यात आलेले आहेत. एकही मूर्ती तलावात विसर्जन केले जात नाही.  त्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देत असल्याचे दिसून आले. 'नटरंग' फेम सोनाली कुलकर्णी यांनी आज गणरायाचे विसर्जन केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास कुटुंबासह तिने बाप्पाला निरोप दिला. शाडूच्या गणेश मूर्तीचं पूजन, आरती केली.  त्यानंतर हौदामध्ये मूर्ती विसर्जित केली. 

गणेशोत्सवाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, ''आमच्या कुटुंबामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव पर्यावरण पूरक होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने चांगले उपाययोजना केलेल्या आहेत. गणेश भक्तांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी करा, पर्यावरणाची काळजी करा आणि मी बाप्पाला विनंती करेल, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.''

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी अभिनेतागणेशोत्सव