Join us

छोटा पडदा मिळवून देतो प्रसिद्धी

By admin | Updated: May 24, 2017 00:29 IST

आदिनाथ कोठारेने ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी एका मालिकेत झळकला होता. छोट्या पडद्यावरील त्याच्या प्रवासाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

प्राजक्ता चिटनिस - आदिनाथ कोठारेने ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी एका मालिकेत झळकला होता. छोट्या पडद्यावरील त्याच्या प्रवासाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...चित्रपटांमध्ये काम करीत असताना तू छोट्या पडद्याकडे कसा वळलास?- छोट्या पडद्यावर काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. पण मला छोट्या पडद्यावर टीपिकल भूमिका साकारायच्या नव्हत्या आणि त्यातही डेली सोपमध्ये काम करायचे नाही असेच मी ठरवले होते. मला काहीतरी वेगळे करायचे होते. मला ठराविक भागांच्या पण काहीतरी वेगळी भूमिका असलेल्या मालिकेत काम करायचे असे माझ्या कित्येक दिवसांपासून डोक्यात सुरू होते आणि मी माझी इच्छा संतोष अयाचित यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी एका वर्षानंतर मला या मालिकेविषयी सांगितले. ही मालिका ठराविक भागांची असल्याने आणि भूमिका खूपच चांगली असल्याने मी छोट्या पडद्याकडे वळलो.छोट्या पडद्यावर काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?- छोट्या पडद्यावर काम करायचा अनुभव खूपच चांगला होता. छोट्या पडद्यावर काम करणे हे खूप ताणतणावाचे असते असे म्हटले जाते. पण या मालिकांमुळे तुम्हाला तितकेच चांगले रिटर्न्स मिळतात. तुम्ही मालिकांच्या माध्यमातून रोज लोकांच्या घराघरात पोहोचत असता आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते. आज मला माझ्या मालिकेने एक वेगळी ओळख आणि लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आहे. ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासून मी माझ्या घराच्याजवळ असलेल्या एका जिमला जात असे. या जिमच्या समोर एक मैदान आहे. तिथे शाळेतील मुले नेहमीच खेळत असत. मी सुरुवातीला जायचो, तेव्हा केवळ काहीच मुले मला भेटायला यायची. पण ही मालिका सुरू झाल्यानंतर महिन्याभरानंतरच त्या मुलांनी मला अक्षरश: गराडा घालायला सुरुवात केली होती. मी दिसलो की, त्या मैदानातील सगळी मुले मला भेटायला येत असत. त्यातून मला मिळालेल्या प्रसिद्धीचा अंदाज येत असे. हीच माझ्या मेहनतीची खरी पावती आहे, असे मला वाटते.चित्रपट आणि मालिका या दोन माध्यमांमध्ये तुला काय फरक जाणवतो?- चित्रपट करीत असताना तुम्ही दिवसाला केवळ दोन-तीन सीनचे चित्रीकरण करीत असता. पण मालिकेसाठी तुम्हाला कमीत कमी २०-२३ दृश्ये दिवसाला चित्रीत करावी लागतात. त्यामुळे दिवसभर चित्रीकरण झाल्यावर अनेक वेळा माझे अक्षरश: डोके गरगरायचे. पण इतक्या व्यग्र शेड्यूलमधूनही मी वेळ काढून व्यक्तिरेखेचा अभ्यास करायचो, त्यातील बारकाव्यांविषयी दिग्दर्शकासोबत चर्चा करायचो. माझे बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करायचो. ही मालिका ठराविक भागांची असल्याने मला हे सगळे करणे बहुधा शक्य झाले होते. मालिका या ठराविक भागांच्या असाव्यात की नाहीत, याबद्दल तुला काय वाटते?- मालिका या किती भागांच्या असाव्यात, हे त्या मालिकेच्या जॉनरवर अवलंबून असते. छोट्या पडद्यावर कथेपेक्षा व्यक्तिरेखेला अधिक महत्त्व असते, असे मला वाटते. प्रेक्षकांना मालिकेच्या गोष्टीपेक्षा मालिकेतील व्यक्तिरेखा अधिक आवडते. लोकांना व्यक्तिरेखेचा प्रवास पाहायला खूप आवडतो. एखाद्या व्यक्तिरेखेमुळेच मालिकेला खरे यश मिळते. त्यामुळे प्रत्येक मालिकेतील व्यक्तिरेखेच्या प्रवासाप्रमाणेच त्या मालिकेचा प्रवासदेखील सुरू असतो.तू एक अभिनेता, निर्माता दोन्ही आहेस. तू स्वत: कोणती भूमिका अधिक एन्जॉय करतो?- मी एक अभिनेता, निर्माता या दोन्ही भूमिका प्रचंड एन्जॉय करतो. पण एक अभिनेत्याची भूमिका मला अधिक जवळची वाटते. कारण एक अभिनेता म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जगायला मिळतात. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळते असे मला वाटते.