Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायक अभिजीत भट्टाचार्य यांची पुन्हा टिवटिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:02 IST

अभिजीत भट्टाचार्य यांनी पुन्हा नवीन ट्विटरवर आपलं अकाऊंट तयार केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाऊंट गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरकडूनच बंद करण्यात आलं होतं. मात्र, अभिजीत भट्टाचार्य यांनी पुन्हा नवीन ट्विटरवर आपलं अकाऊंट तयार केलं आहे. 

58 वर्षीय गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी नवीन ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये राष्ट्रविरोधींच्या मी विरोधात असल्याचे म्हटले आहे. हे माझे ट्विटरचे नवीन अकाऊंट आहे. जोपर्यंत माझे खरे अकाऊंट सुरु होत नाही. तोपर्यंत माझ्या या अकाऊंटला फॉलो करा. या व्यतिरिक्त माझ्या नावची सर्व ट्विटर अकाऊंट बनावट असून माझी प्रतिष्ठा खराब करत आहेत, असे अभिजीत भट्टाचार्य यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. त्याचबरोबर, वंदे मातरम्... मी परत आलोय... राष्ट्रविरोधी माझा आवाज बंद करु शकत नाहीत... भारतीय लष्कराला सलाम. हे माझे नवीन ट्विटर अकाऊंट आहे. बाकी सर्व बनावट आहेत...अशी कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ट्विट करणारे गायक अभिजीत भट्टाचार्य यांना ट्विटरनेच दणका दिला. ट्विटर अकाऊंट बंद करत त्यांची बोलतीच बंद केली होती. अभिजीत भट्टाचार्य कोणत्या-ना-कोणत्या विषयावर वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत येत होते. यावर ट्विटरच्या काही युजर्सनी सतत त्यांच्या आयडीला रिपोर्ट केले. त्यानंतर ट्विटरने याची दखल घेत अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काळात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होतं असं टि्वट केले होतं. त्यांच्या या ट्विटचं अभिजीत भट्टाचार्य यांनी समर्थन केलं होतं.  केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्यांनी अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं होतं.