चौर्य हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. एका वेगळ्या विषयावर दिग्दर्शक समीर पाटील यांनी या चित्रपटातून प्रकाश टाकला आहे. या सिनेमाचे शूटिंग चंबळच्या खोऱ्यात झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री तीर्था मुरबाडकर ही मराठमोळी मुलगी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाविषयी संवाद साधला असता, तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. या सिनेमाचे शूटिंग चंबळच्या खोऱ्यात करण्याचे ठरले. माझ्यासाठी हा खरेच एक थरारक अनुभव होता. जेव्हा मला समजले, की चंबळला जायचेय तेव्हा मी खूपच एक्साइटेड होते. पण, माझ्या आई-वडिलांना थोडी भीती वाटली. कारण सेटवर मी एकटीच मुलगी होते. हॉटेलपासून सेटपर्यंत आम्हाला गाडीतून ड्रायव्हर न्यायचा. त्याच्या गाडीत हॉकी स्टिक आणि बाकी हत्यारे असायचे. तिथे चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच थरारक होता. माझी ही पहिलीच मराठी फिल्म असल्याने मी झपाटून काम केले. तीर्थाने एफटीआयआयमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमधून कोर्स पूर्ण करून ती बाहेर पडली, तेव्हा तिला पहिलीच फिल्म दक्षिणेकडची मिळाली. साऊंथा वोरू या तेलुगू चित्रपटात तिने काम केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळविला. आता दक्षिणेतील या अभिनेत्रीचा मराठमोळा तडका पाहायचा असेल, तर चौर्य सिनेमाचीच वाट पाहावी लागणार आहे.
चंबळमध्ये ‘चौर्य’चे शूटिंग
By admin | Updated: August 1, 2016 02:27 IST