Join us
Daily Top 2Weekly Top 5

परत येतंय 'ती फुलराणी'...

By admin | Updated: March 7, 2016 12:33 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे 'ती फुलराणी' हे नाटक परत येत असून हेमांगी रवी व डॉ. गिरीश ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. काळानुरूप ही 'फुलराणी' बदललीही... भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ अत्युत्तम कामगिरी करत 'फुलराणी'ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम लाभलेलं हे नाटक आता पुन्हा नव्या रुपात रंगमंचावर अवतरणार असून प्रसिद्ध व गुणी अभिनेत्री 'हेमांगी कवी' हे शिवधनुष्य पेलणार आहे तर प्राध्यापकांच्या भूमिकेत असणार आहेत ज्येष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक... 'तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं ठसक्यात म्हणत रसिकांची उत्कंठा वाढवण्यास हेमांगी सज्ज झाली आहे. 
‘अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित’ ‘एँडोनिस एण्टरप्रायजेस’ प्रकाशित ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या बाजात लवकरच रंगभूमीवर येत आहे. धनंजय चाळके याचे निर्माते असून नव्या रुपात आणि नव्या संचात हे नाटक आणण्याचे आव्हान लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पेललं आहे. 
' हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नाटकाद्वारे करत असल्याची भावना राजेश देशपांडे यांनी व्यक्त केली. या नाटकाच्या संहितेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करत तांत्रिक बाबतीत मात्र थोडे बदल करण्यात आले आहेत' असे त्यांनी नमूद केले. 
हेमांगी कवी व डॉ. गिरीश ओक यांच्यासोबतच नाटकात मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव हे कलाकारही आहेत. तर नितीन नाईक सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. ‘तिन्ही सांजा’ व ‘स्पिरीट’ या नाटकांचं सध्या गाजत असलेलं नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकाचं नेपथ्य केलं आहे. ‘लोकमान्य’साठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा झी चा विशेष पुरस्कार पटकावणाऱ्या महेश शेरला यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली असून रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. एक ‘पोरगी नाक्यावरती’ फेम निषाद गोलांबरे यांचं संगीत या नाटकाला लाभलं असून भूषण देसाई यांनी प्रकाशयोजना सांभाळली आहे.