Join us  

'तिथे माझ्यासाठी जागा नाही...', हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या प्रश्नावर शाहरुख स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 2:38 PM

दोन ब्लॉगबस्टर चित्रपट देऊन शाहरुख खानने यावर्षी धमाका केला आहे.

Shahrukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुख साठी हे वर्ष खूप खास आहे. शाहरुखचे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरले. 'पठान'ने जगभरात एक हजार कोटींची कमाई केली, तर 'जवान' त्याच दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 700 कोटींचा व्यवसाय केला आहे. या दोन चित्रपटांमधून शाहरुखने पुन्हा एकदा तोच बॉलिवूडचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, किंग खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रतिक्रिया देतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खानलाहॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आला होता. उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, 'माझे इंग्रजी चांगले नाही, मला इंग्रजी नीट येत नसल्याने मला ते मूर्ख व्यक्तीची भूमिका देतील. मी 42 वर्षांचा आहे, मी थोडा सावळा आहे. अभिनेता म्हणून माझा काही खास यूएसपी नाही. एक अभिनेता म्हणून माझ्याकडे विशेष कौशल्य नाही.'

'मला कुंग फू येत नाही, मला लॅटिन किंवा साल्सा नृत्य येत नाही. मी खूप उंचही नाही. मला असे वाटते की माझ्या वयातील व्यक्तीला हॉलिवूडमध्ये जागा नाही. मी तितका प्रतिभावान आहे, असे मला वाटत नाही. मला भारतात आणखी काम करायला आवडेल. मला भारतीय चित्रपट जगाभरात न्यायचे आहेत, हेच माझे स्वप्न आहे,' अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिली.

शाहरुख खानच्या उत्तराने तेव्हाही चाहत्यांची मने जिंकली होती आणि आजही हा व्हिडिओ पाहून चाहते शाहरुखचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे, शाहरुखचे फक्त भारतात नाही, तर जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. 'पठान'नंतर आता शाहरुखने 'जवान'मधून मोठा धमाका केला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'डंकी' राजू हिरानीसोबत आहे, या चित्रपटाबाबतही चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडजवान चित्रपटपठाण सिनेमाहॉलिवूड