Join us

शाहिद कपूर करतोय डिजिटल पदार्पण, राज आणि डीकेच्या नवीन सीरिजमध्ये होणार धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 14:20 IST

राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी ड्रामा थ्रिलर सिरीजची निर्मिती केलेली असून त्यामध्ये शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी ओरिजिनल सिरीजची घोषणा केली. सिरीजचे नाव अद्याप ठरलेले नसून अभिनेता शाहिद कपूर यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी ड्रामा थ्रिलर सिरीजची निर्मिती केलेली असून त्यामध्ये शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गडद आणि प्रहसनात्मक विनोदनिर्मितीकरता प्रसिद्ध असलेल्या राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या जवळजवळ २४० पेक्षा अधिक देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर या जोडीच्या निर्मितीतून साकारलेले हे आगामी आकर्षण आहे. सीता. आर. मेनन, सुमन कुमार आणि हुसेन दलाल हे या शोचे सहलेखक आहेत.

शाहिद कपूर म्हणाला, “मला राज आणि डीके यांच्यासमवेत काम करण्याची अत्यंत मनापासून इच्छा होती. ‘द फॅमिली मॅन’ हा माझा सर्वात आवडती सीरिज आहे. माझ्या डिजिटल व्यासपीठावरील पदार्पणासाठी मला त्यांच्याइतके योग्य दुसरे कोणीही वाटले नाही. त्यांच्यासोबत काम करायला मिळते आहे याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी जेव्हा पहिल्यांदा ही कथा संकल्पना ऐकली तेव्हाच ती मला अतिशय भावली होती.तेव्हापासून आतापर्यंतचा आमचा एकत्रित प्रवास खरोखरच रोमांचकारी आहे.”

राज आणि डीके ही निर्माती जोडी म्हणाली, “आम्ही करतो त्या प्रत्येक कलाकृतीमध्ये आमच्याच पूर्वीच्या कालाकृतीपेक्षा उत्तम काहीतरी देणे हेच आमच्यासमोरील आव्हान असते.ही आमची सर्वात आवडती संहिता आहे. या अत्यंत प्रेमाने तयार केलेल्या संहितेसाठी आम्हाला शाहिद हा एकमेव अभिनेता परिपूर्ण वाटला. या सीरिजसाठी शाहिद आमची सुरुवातीपासूनची एकमेव निवड होती. आम्ही लगेच त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्याशी या प्रकल्पाविषयी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून आजपर्यंत आमचे सूर तंतोतंत जुळले आहेत. शाहिदला पाहणे आणि त्याच्यासह काम करणे ही नेहमीच आनंदाची बाब असते. तो ज्या आत्मियतेने भूमिका साकारतो ते पाहणे विलोभनीय असते.

अमेझॉन प्राईम व्हिडीओशी आमचे जुने बंध आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी काम करताना आम्हाला अधिक जबाबदारी वाटत असते. ते अतिशय उत्तम भागीदार आहेत. ही सीरिज तयार करण्यास आम्ही उत्सुक आहोत!”या सीरिजमधील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरीही ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूर