Join us

सेन्सर बोर्डाच्या कात्रीला पुन्हा धार, 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटावर आक्षेप

By admin | Updated: February 24, 2017 17:08 IST

सेन्सर बोर्ड पुन्हा एकदा चर्चत आलं असून यावेळी अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' चित्रपट त्याच्या निशाण्यावर आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सेन्सर बोर्ड पुन्हा एकदा चर्चत आलं असून यावेळी अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' चित्रपट त्याच्या निशाण्यावर आहे. चित्रपटात देण्यात आलेले लैंगिक संदर्भ तसंच आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आल्याने चित्रपटाला मंजुरी देण्यास सेन्सर बोर्डाने नकार दिला आहे. यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सेन्सर बोर्डाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 
 
(सेन्सॉर बोर्डाकडून यापुढे चित्रपटांना कात्री लागणार नाही?)
(१२ चुंबनदृश्यांवर संस्कारी सेन्सॉर बोर्ड 'बेफिक्रे')
 
अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित आणि प्रकाश झा निर्मित 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' चित्रपट भारतातील छोट्या शहरांमधील महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, अहाना कुमार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 
 
श्याम बेनेगल समितीने बोर्डाला प्रमाणपत्राच्या आपल्या पद्दतीत बदल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतरही चित्रपटाला अशाप्रकारे झगडावं लागत आहे. श्याम बेनेगल यांनी 'आपण हा चित्रपट पाहिला नसल्याने कशावर आधारित आहे याची कल्पना नाही, मात्र अशाप्रकारे चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला जाऊ शकत नाही', असं म्हटलं आहे.
 
चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी नकार देताना दिलेल्या कारणांमध्ये सेन्सर बोर्डाने सांगितलं आहे की,'हा चित्रपट महिलांवर आधारित आहे, ज्यामध्ये सामान्य जीवनाच्या पुढे जात कल्पनेतील जग दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अनेक वादग्रस्त सीन्स, शिव्या, ऑडिओ पॉनोग्राफी आणि समाजातील काही संवेदनशील गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यामुळे चित्रपटाला नाकारलं जात आहे'.
 
सेन्सर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं असून सेन्सर करणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.