Join us  

संतोषने दिला 'वादळवाट'च्या आठवणींना उजाळा; शेअर केला मालिकेतील रोमॅण्टिक सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 7:15 PM

Santosh juvekar: वादळवाट ही मालिका संपून आज बरेच वर्ष झाले. मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.

उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (santosh juvekar). मालिका, चित्रपट अशा कितीतरी माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. झेंडा, मोरया या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संतोषने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'वादळवाट'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं. ही मालिका संपून आज बरेच वर्ष झाले. मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे संतोषने अलिकडेच या मालिकेतील एक व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'वादळवाट' ही मालिका त्या काळात प्रचंड गाजली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंस  केलं होतं. त्यामुळे या मालिकेचं शीर्षक गीत, त्यातील काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामध्येच संतोषने त्याचा आणि अभिनेत्री मिताली जगताप यांचा एक रोमॅण्टिक सीन शेअर केला आहे.

'एक खूपच गोड आठवण तुमच्या सोबत शेअर करतोय. खरं तर ती आपल्या सगळ्यांचीच गोड आठवण आहे. आवडली तर नक्की सांगा कशी वाटली', असं कॅप्शन देत संतोषने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी मालिकेचं गाजलेलं शीर्षक गीत सुरु होतं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर सुंदर सुंदर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :संतोष जुवेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन