ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, ४ - अभिनेता सलमान खानने केलेल्या बलात्काराच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठत असताना बॉलिवूड कलाकारांनी मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काहींनी या विषयावर सोयीस्कर दुर्लक्ष केले तर काहींनी त्याविषयी गुळमुळीत प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने मात्र या विषयावर थेट भाष्य करत सलमानचं ते वक्तव्य 'असंवेदनशील व दुर्दैवी' असल्याची प्रतिक्रिया दिली.
सोमवारी आमिरच्या बहुचर्चित 'दंगल' चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले, त्यावेळी आमिरला सलमानच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ' सलमानने हे वक्तव्य केले . तेव्हा मी तेथे उपस्थित नव्हतो. मात्र यासंबंधी मीडियातील बातम्या वाचल्यानंतर मला असं वाटतं की त्याचे ( बलात्कार पीडितेचे) वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी आणि असंवेदनशील होते', असे आमिरने सांगितले.
आणखी वाचा :
'सुलतान' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली होती. लाखतीदरम्यान सलमानला 'सुलतान' चित्रपटात कुस्तीपटूची भुमिका निभावणं किती कठीण गेलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 'सहा तास सलग शुटींग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण 120 किलो वजनाच्या व्यक्तीला मला 10 वेळा आणि तेदेखील 10 वेगवेगळ्या अँगलने उचलावं लागायचं. त्याचप्रमाणे मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचं. ख-या खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं. मला सरळ चालणं शक्य व्हायचं नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो' असं उत्तर सलमान खानने दिलं. त्याच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला व अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडत माफीची मागणी केली. त्याच्या या वक्तव्याबाबत त्याचे वडील व प्रख्यात लेखक सलीम खान यांनी ट्विटरवरून माफी मागितली होती. मात्र सलमानने त्यावर मौन सोडले नाही.
त्यानंतर महिला आयोगानेही सलमानला नोटीस पाठवली होती. मात्र सलमानने त्या नोटीशीला उत्तर दिले, पण माफी मागितली नाही. याप्रकरणी महिला आयोगाने त्याला ७ तारखेला हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सलमानच्या वक्तव्यावर भरपूर गदारोळ माजलेला असताना बॉलिवूडकरांनी मात्र त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाहरूख खाननेही त्यावर थेट भाष्य करणे टाळले.