Join us

सलमान, अम्मा, सहारांवर विनोद नको - सेन्सॉर बोर्ड

By admin | Updated: May 29, 2015 12:22 IST

सेन्सॉर बोर्ड व सिनेदिग्दर्शक यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे नसून सलमान खान, अम्मा (जयललिता) व सहारा यांच्यावर विनोद नको असे सांगत सेन्सॉर बोर्डाने एका चित्रपटातील दृश्यांना कात्री लावली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २९ - सेन्सॉर बोर्ड व सिनेदिग्दर्शक यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे नसून सलमान खान, अम्मा (जयललिता) व सहारा यांच्यावर विनोद नको असे सांगत सेन्सॉर बोर्डाने एका चित्रपटातील दृश्यांना कात्री लावली आहे. मात्र या मंडळींची नावे का नको यावर सेन्सॉर बोर्डाने कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. 
बॉलीवूडमधील दिग्दर्शक कुंदन शाह यांचा 'पी से पीएम तक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असला तरी अद्याप तो सेन्सॉर बोर्डाच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतिक्षेत आहे. वेश्याव्यवसायातील एक मुलगी मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधानपदाची निवडणूक लढवते असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटात सलमान खान, अम्मा व सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांच्यावर काही विनोद होते. सेन्सॉर बोर्डाने या संवादांवर कात्री लावल्याने दिग्दर्शक कुंदन शाह यांनी नाराजी दर्शवली आहे. या तिघांवरील विनोदात आक्षेपार्ह काहीच नव्हते मात्र तरीदेखील सेन्सॉर बोर्डाने या दृश्यांना कात्री लावली, सेन्सॉर नेमकं कोणाला घाबरतंय असा सवालही कुंदन शाह यांनी उपस्थित केला आहे. जाने भी दो यारो, कभी हा कभी ना अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन कुंदन शाह यांनी केले आहे. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनीदेखील याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.