Join us  

Salman Khan House Firing: 'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:59 PM

Salman Khan House Firing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सलीम खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्याने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. भल्या पहाटे दोन गुंडांनी दुचाकीवर येत गॅलक्सीवर पाच गोळ्या झाडल्या. कालच दोन्ही शूटर्सना अटक करण्यात आली. सलमानला घाबरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईनेच या गुंडांना पैसे दिल्याचं तपासात समोर आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी सलीम खानही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी बातचीत केल्यानंतर सलीम खान (Salim Khan) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

सलमान खानचे वडील आणि ज्येष्ट लेखक सलीम खान हे अनेक वर्षांपासून गॅलक्सीमध्येच राहतात. सलमानही त्यांच्यासोबत याच अपार्टमेंटमध्ये राहतो. गोळीबाराच्या घटनेनंतर गॅलक्सीबाहेरची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सलीम खान यांनी 'इंडिया टुडे' ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "घाबरण्याचं काही कारण नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सरकारने आम्हाला पूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. तसंच सलमान कुठलीच चिंता न करता त्याचं काम करु शकतो असं ते म्हणाले आहेत. कारण पोलीस त्यांचं काम करत आहे. जो माणूस (लॉरेन्स बिश्नोई) फक्त हेच म्हणतो की मारेन तेव्हा समजेल. अशा अशिक्षित लोकांबद्दल अजून काय बोलणार?"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गोळीबार प्रकरणारवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. सरकार सलमानसोबत आहेच."

सलमान खानला याआधीही धमक्या आल्या होत्या. मात्र थेट गोळीबारच झाल्याने आता सरकारही सावध झालं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कॅनडात बसून त्याने हा कट रचल्याचंही उघड झालं. यामुळे सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आता आणखी सक्रीय झाले आहेत. 

टॅग्स :सलीम खानसलमान खानगोळीबारबॉलिवूडमुंबई पोलीस