Join us  

"सलमान खानला फक्त एकच व्यक्ती हरवू शकतो" सलीम खान यांचं लेकाबद्दल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 4:19 PM

नुकतेच सलीम खान मुलगा अरबाज खानच्या शो मध्ये सलमानविषयी भरभरुन बोलले.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) नुकताच 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सलमानचे चाहते तर सिनेमाचं कौतुक करत आहेत मात्र बाकी प्रेक्षकांकडून खास प्रतिक्रिया आलेली नाही. नुकतेच सलीम खान (Salim Khan) मुलगा अरबाज खानच्या शो मध्ये सलमानविषयी भरभरुन बोलले.

अरबाज खानचा (Arbaaz Khan)नवीन शो 'द इनव्हिजिबल्स' ची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये वडील सलीम खान यांच्याशी अरबाज गप्पा मारत आहे. अरबाजने विचारले,'सलमान खानचे सुरुवातीचे सिनेमे बघून तुम्हाला असं वाटलं होतं का की तो स्टार होईल?' यावर सलीम खान यांनी उत्तर दिले की,'त्याच्यात क्षमता आहे हे मी ओळखलं होतं. अगदी १०० टक्के. मात्र सोबतच मी त्याचा स्वभावही ओळखून होतो. तो कधीच गोष्टी गांभीर्याने घेत नाही. त्याच्यात कमालीची क्षमता आहे. तर मला वाटलं की हा १०० टक्के स्टार बनेल.'

ते पुढे म्हणाले, 'जर त्याला कोणी नुकसान पोहोचवू शकतं तर ते तो स्वत:च आहे. आता सुद्धा त्याने राहिलेलं करिअर गांभीर्याने घेतलं पाहिजे. अभिनेता म्हणून त्याच्यात भरपूर सुधारणा झाली आहे. त्याच्यात आत्मविश्वास आहे. सुलतान मधील भूमिका त्याने चांगली निभावली. बजरंगी भाईजानमध्येही त्याने उत्तम केले.'

सलमानच्या करिअर आणि आयुष्यात दखल देता का? यावर सलीम खान म्हणाल ,'जेव्हा मला वाटतं की हे नाही होऊ शकत मी त्याला थांबवतो. सगळ्यात महत्वाचं आहे की त्याने चांगल्या स्क्रिप्ट निवडल्या पाहिजेत. ज्यात दाखवायला खरंच काही आहे अशा स्क्रिप्ट घ्याव्यात'

सलमान खान सलीम खान यांचा मोठा मुलगा आहे. आजही त्यांना लेकाच्या करिअरची काळजी वाटते. त्यांनी दिलेली ही मुलाखत सलमानला नक्कीच नवी दिशा देणारी आहे. 

टॅग्स :सलीम खानसलमान खानअरबाज खान