Join us  

पाकिस्तानही होणार 'झिंगाट'; कराचीमधील चित्रपट महोत्सवात झळकणार 'सैराट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 5:17 PM

संपूर्ण भारतातील सिनेरसिकांना  'याड' लावणारा मराठमोळा 'सैराट' आता पाकिस्तानी प्रेक्षकांनाही  झिंग झिंग झिंगाट च्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या सैराट चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता दोन वर्ष पूर्ण होणार आहे.   झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंगाटच्या बोलांवर सैराटने मराठीच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांना याड लावलं होतं.  संपूर्ण भारतातील सिनेरसिकांना  'याड' लावणारा मराठमोळा 'सैराट' आता पाकिस्तानी प्रेक्षकांनाही  झिंग झिंग झिंगाट च्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे.  पाकिस्तान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) बॉलिवूडच्या मोजक्या सिनेमांसोबतच 'सैराट'ही दाखवला जाणार आहे. २९ मार्च ते १ एप्रिल या काळात कराचीमध्ये पीफ सोहळा रंगणार आहे. या महोत्सवात डिअर जिंदगी, आंखो देखी, हिंदी मिडियम, कडवी हवा, नील बांटे सन्नाटा या बॉलिवूडच्या चित्रपटांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे, 'बाहुबलीः द बीगिनिंग' आणि 'बाहुबली2: द कन्क्लूजन' या भव्यदिव्य चित्रपटांचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनाही पाकिस्ताननं महोत्सवासाठी आमंत्रित केलंय.  या दौऱ्याबद्दल ते भारीच उत्सुक आहेत.

सैराट सिनेमातून आर्ची आणि परशा  अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर  अल्पावधीतच घराघरांत पोहोचले  होते. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट बनण्याचा मानही पटकावला होता. या चित्रपटाला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.