Join us

सैफ अली खान 'पद्म' पुरस्कार गमावणार?

By admin | Updated: August 7, 2014 15:20 IST

अभिनेता सैफ अली खानला मिळालेला 'पद्मश्री' पुरस्कार काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - अभिनेता सैफ अली खानला मिळालेला 'पद्मश्री' पुरस्कार काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका न्यायालयात सैफविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने सरकार या मुद्याचा विचार करत आहे. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सैफला २०१० साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
आरटीआय कार्यकर्ते एस. सी. अगरवाल यांनी मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार दाखल करून सैफचा सन्मान काढून घेण्याची मागणी केली होती. 
मुंबईतील एका हॉटेलमध्ये सैफ व त्याच्या दोन मित्रांनी दक्षिण आफ्रिकेतील एक उद्योगपती व त्याच्या सास-यांना मारहाण केल्याप्रकरणी खटला सुरू असून मुंबई न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. 'एखाद्या व्यक्तीचे नुकसान करणा-या सैफचा सन्मान काढून घ्यावा' अशी मागणी अगरवाल यांनी केली होती. आपण दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न अगरवाल यांनी माहिती कायद्याअंतर्गत विचारला होता. त्याला उत्तर देताना 'त्या मुद्यावर विचार सुरू असल्याचे' गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 
सैफला 'पद्म' पुरस्कार जाहीर झाल्यावरही या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. ' एवढा मोठा पुरस्कार देण्याइतपत सैफचे या क्षेत्रात योगदान काय?' असा प्रश्नही विचारण्यात आला होता.