Join us

इमेजपेक्षा भूमिका महत्त्वाची वाटते

By admin | Updated: June 25, 2016 01:21 IST

मनाच्या कोपऱ्यात कायमच बंदिस्त करून ठेवाव्यात अशा अप्रतिम कवितांचा खजिना या कवीच्या पोटलीतच आहे. आपल्या कवितांनी आज घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे संदीप खरे

मनाच्या कोपऱ्यात कायमच बंदिस्त करून ठेवाव्यात अशा अप्रतिम कवितांचा खजिना या कवीच्या पोटलीतच आहे. आपल्या कवितांनी आज घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे संदीप खरे. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्याने आज सर्वत्र ओळखले जाणारे संदीप खरे आता दमलेल्या बाबाची कहाणी या सिनेमामध्ये बाबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी संदीप खरे यांनी ‘सीएनएक्स’शी साधलेला हा मनमोकळा संवाद... एखाद्या गाण्यावरून काढलेला हा पहिलाच चित्रपट आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते?दमलेल्या बाबाची कहाणी या गाण्याला लोकांनी खूपच पसंती दर्शविली. पालकांनी तर या गाण्याला डोक्यावर घेतले होते. आता या गाण्यावर चित्रपट काढायचा, ही कल्पनाच खूप चांगली होती. हे गाणे ऐकताना प्रत्येकानेच याचे व्हिज्युअलायझेशन करून घेतले होते. आता हे गाणे चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बाप-लेकीची कहाणी तर आहेच; परंतु यापलीकडे जाऊन समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावरदेखील प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक आशयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. दमलेल्या बाबाची कहाणी हा सिनेमा स्वीकारण्यामागील तुमची भूमिका काय?मी जेव्हा या सिनेमाची कथा ऐकली, तेव्हाच मला तो चित्रपट आवडला. त्यातील बाबाची भूमिका मला भावल्याने मी तो करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील बाबा हा तरुण वयापासून वृद्धापर्यंत असा दाखविण्यात आला आहे. एक अभिनेता म्हणून आव्हानात्मक भूमिका करण्याची ही संधी मिळाल्याने मी हा चित्रपट स्वीकारला.या चित्रपटात बाबाची भूमिका करण्यासाठी काही तयारी केली होती का?मी नाटकात पूर्वी काम केले असल्याने माझ्यासाठी हे क्षेत्र काही फार नवीन नव्हते किंवा मी अगदीच वेगळ्या ठिकाणी आलोय, असेही नव्हते. आपण नेहमीच्या आयुष्यात जगत असताना आपल्या सभोवती अनेक वेगळ्या प्रकारची माणसे असतात. त्यांच्या नकळत निरीक्षणातूनच तुम्ही खूप काही शिकता. त्यामुळे मला वेगळी अशी तयारी करावी लागली नाही. सभोवतालच्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मला तो बाबा सापडला. तुम्हालादेखील मुलगी आहे; मग व्यक्तिगत आयुष्यातील बाबा अन् या चित्रपटातील बाबा यांमध्ये किती साम्य आहे ?हा चित्रपट पाहताना प्रत्येक बाबालाच यामध्ये आपली प्रतिमा दिसू शकते, असा तो सर्वांच्या जवळ जाणारा, प्रत्येकाला रिलेट करणारा बाबा आहे. तो जसा मुलीच्या काळजीने घुसमटलेला, दमलेला आहे तसाच एका पॉइंटला अ‍ॅग्रेसिव्हदेखील आहे. त्यामुळे मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात असा जरी नसलो, तरी यातील काही सीन्स करताना मला नकळतपणे मी दिसायचो.सध्या रोमँटिक हिरोंची क्रेझ सताना, तुम्ही बाबांच्या भूमिकेत दिसणार आहात, याबद्दल काय सांगाल ?मी खरंच सांगू का? मला बागेमध्ये गाणी म्हणत हिंडणाऱ्या हिरोंचे रोल करायचे नाहीत. मी ‘माझ्या मित्रा’ या पहिल्या सिनेमाता कॉलेज तरुणाची भूमिका केली होती; पण तो रोलदेखील वेगळा होता. या चित्रपटात जो बाबा दाखविण्यात आला आहे, तो खूपच सशक्त अन् एक अभिनेता म्हणून वेगळ्या उंचीवर जाणारा आहे. मला इमेजपेक्षा माझी भूमिका महत्त्वाची वाटते. भूमिकेनुसार अभिनेत्याने स्वत:ला बदलले पाहिजे. त्यामुळे कोणत्या इमेजमध्ये अडकून न राहता चांगल्या दर्जाच्या भूमिका करायला मी प्राधान्य देईन. यापुढे चित्रपटाच्या काही आॅफर आल्या, तर काम करायला आवडेल का?हो, नक्कीच मला सिनेमामध्ये काम करायला आवडेल. सिनेमा हे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी एक सशक्त अन् प्रभावी माध्याम आहे. चांगले विषय आले तर मी काम करण्याचा विचार करेनच.