Join us  

'गरीब लेखकांची खिल्ली उडवता का?' रितेश देशमुखच्या प्रश्नावर सलीम-जावेद जोडीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:52 AM

दीपोत्सव कार्यक्रमात रितेश देशमुखने सलीम जावेद जोडीची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे.

दिवाळी सण धुमधडाक्यात सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल शिवाजी पार्क येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आकर्षक दिव्यांनी अख्खं शिवाजी पार्क सजलं होतं. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar), सलीम खान (Salim Khan), अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी रितेशने सलीम जावेद या जोडीची मुलाखत घेतली. 

दीपोत्सव कार्यक्रमात रितेश देशमुखने सलीम जावेद जोडीची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी ईडी सीबीआयचा उल्लेख केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अर्थात ही मुलाखत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झाली. रितेशने जुने चित्रपट ते आताच्या ओटीटीच्या जमान्यापर्यंत प्रश्न विचारले. रितेश म्हणाला, 'आधी फिल्म्स बनायचे तेव्हा सुपरस्टार्स १५ लाख रुपये चार्ज करायचे.' हे ऐकताच जावेद अख्तर मिश्किलपणे म्हणाले,'तुम्ही काय आम्हाला इनकम टॅक्समध्ये फसवणार आहात का? काय आवडेल तुम्हाला सीबीआय, ईडी की इन्कम टॅक्स? हे १२ लाख-१५ लाख काय आहे आम्ही तर कधी बघितलेही नाही. तुम्ही आमच्यासारख्या गरीब लेखकांची खिल्ली उडवत आहात?' तर सलीम खानही मजा घेत म्हणाले,'आम्हाला काय आतमध्ये टाकायचा विचार आहे का?'

ही मजामस्ती झाल्यावर रितेश देशमुखने आपला प्रश्न पूर्ण केला. तो म्हणाला, 'तेव्हा सुपरस्टार्सना 15 लाख म्हणायचे त्याच काळी सलीम जावेद जोडीला 25 लाख मिळायचे.तेव्हा जावेद अख्तर म्हणाले, 'हे जनतेचं प्रेम आहे. पण हे दुर्दैवाने खरं नाहीए. आम्हाला कलाकारांपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर कदाचित तेव्हा कलाकारच कमी पैसे घेत असतील. याला आमच्या फाईल ओपन करायच्या आहेत.'

रितेशने घेतलेली ही उत्सफुर्त मुलाखत पाहून सर्वांनाच हसू अनावर झालं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या या दीपोत्सव कार्यक्रमात रंगलेल्या गप्पांची चांगलीच चर्चा आहे. 

टॅग्स :सलीम खानजावेद अख्तररितेश देशमुखराज ठाकरे