Join us  

The Vaccine War Movie Review : जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावरील लढाई 'व्हॅक्सिन वॉर'

By संजय घावरे | Published: September 29, 2023 4:04 PM

The Vaccine War Movie Review : जाणून घ्या कसा आहे, नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांचा 'व्हॅक्सिन वॉर'

Release Date: September 29, 2023Language: हिंदी
Cast: नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक, रायमा सेन, अनुपम खेर, निवेदिता भट्टाचार्य
Producer: पल्लवी जोशीDirector: विवेक अग्निहोत्री
Duration: २ तास ४१ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

कोरोना काळातील भयाण वातावरण सर्वांनीच अनुभवलं, पण त्यातून मानव जातीला वाचवण्यासाठी पडद्यामागे लढल्या गेलेल्या व्हॅक्सिन बनवण्याच्या लढाईबाबत फार कोणाला माहित नाही. प्रतिकूल परिस्थितीत 'इंडिया कॅन डू ईट' असे म्हणत प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर भारतीय शास्त्रज्ञांनी लढलेली जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावरील लढाई या चित्रपटात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सादर केली आहे. 

कथानक : चित्रपटाची कथा चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या काळापासून सुरू होते. टप्प्याटप्प्याने येणाऱ्या १२ प्रकरणांद्वारे कथानक पुढे सरकत जातं. द इंडियन काउंसल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर)महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांना चीनमधील वुहानमध्ये पसरलेल्या व्हायरसची माहिती मिळते. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर भार्गव यांच्या टिमकडे कोव्हिड-१९ व्हॅक्सिन बनवण्याची जबाबदारी सोपवली जाते. आयसीएमआ, भारत बायोटेक आणि पुण्यातील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही)चीफ डॉ. प्रिया यांची टिम व्हॅक्सिन बनवण्याच्या कामात स्वत:ला झोकून देतात. डॉ. निवेदितासारख्या महिला शास्त्रज्ञ कोरोनावर मात करण्यासाठी घर-दार विसरून काम करतात. यासाठी त्यांना कोणकोणतं दिव्य करावं लागतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन - पडद्यामागे राहून जागतिक पातळीवर भारताला वैद्यकीय क्षेत्रात फ्रंट फूटवर उभ्या करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कार्याला सलाम करणारी कथा चांगली असली तरी त्या काळातील भयाण वातावरण कुठेतरी कमी वाटतं. यातील बरेच संवाद वैद्यकीय भाषेत असून अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. काही संवाद प्रेरणादायी आहेत, तर काही भावूक करतात. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारताने घेतलेली भूमिका, शास्त्रज्ञांचा रिसर्च, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी केलेला संघर्ष, सरकारने दिलेला पाठिंबा, मीडियाने केलेली दिशाभूल, महिला शास्त्रज्ञांचा त्याग, परदेशातील रेस्क्यू ऑपरेशन आणि अखेरीस मिळवलेला विजय असं कथानक विविध प्रकरणांद्वारे पुढे जातं. मध्यंतरानंतरचा भाग थोडा लांबल्यासारखा वाटतो. लांबी थोडी आणखी कमी करता आली असती. क्लायमॅक्स भावूक करणारा आहे.

अभिनय - एक वेगळेच नाना पाटेकर या चित्रपटात दिसतात. दिरंगाई न खपवून घेणारे, आपलंच खरं करणारे आणि अत्यंत घाईत असलेले शास्त्रज्ञ नानांनी सुरेखपणे रेखाटले आहेत. पल्लवी जोशीने आपल्या व्यक्तिरेखेतील छटा कुशलतेने सादर केल्या आहेत. गिरीजा ओकसाठी 'जवान'नंतर हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा ठरला आहे. तिने अफलातून अभिनय केला आहे. निगेटीव्ह छटा असलेल्या पत्रकाराची भूमिका रायमा सेनने पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. अनुपम खेर यांनीही संयत अभिनय केला आहे.

सकारात्मक बाजू - लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, कॅमेरावर्क, पार्श्वसंगीतनकारात्मक बाजू - संकलन, मध्यंतरानंतरची गती, चित्रपटाची लांबीथोडक्यात काय - फ्रंट फूटवर लढणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा गौरव सर्वांनीच केला, पण पडद्यामागे राहून खरी लढाई लढणाऱ्यांचा गौरव करणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा.

टॅग्स :नाना पाटेकरपल्लवी जोशीगिरिजा ओकविवेक रंजन अग्निहोत्री