Join us  

Merry Christmas Review: ख्रिसमस नाईटची रहस्यमय सफर, कसा आहे श्रीराम राघवन यांचा चित्रपट वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: January 12, 2024 4:18 PM

हा टिपिकल श्रीराम राघवन शैलीतील रोमांचक आणि रहस्यमय सिनेमा आहे

Release Date: January 12, 2024Language: हिंदी
Cast: कतरीना कैफ, विजय सेतुपती, राधिका आपटे, विनय पाठक, संजय कपूर, अश्विनी काळसेकर, प्रतिमा काझमी, टिनू आनंद
Producer: रमेश तौरानी, जया तौरानी, संजय राउतराय, केवल गर्गDirector: श्रीराम राघवन
Duration: 2 तास 24 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

हा टिपिकल श्रीराम राघवन (Sriram Raghavan) शैलीतील रोमांचक आणि रहस्यमय सिनेमा आहे. एका रात्रीत घडणारं कथानक आणि हळूहळू उलगडत जाणारं रहस्य यामुळे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. तगड्या कलाकारांची निवड, नावीन्यपूर्ण पार्श्वसंगीत आणि अनोखी संकल्पना यांचा मेळ या सिनेमात घालण्यात आला आहे.

कथानक :

एखाद्या रात्री आपण सहज फिरायला बाहेर पडावं, एखाद्या रेस्टॅारंटमध्ये जेवण करत असताना एखादी सुंदर स्त्री भेटावी, तिला मदत करण्याकरीता तिच्या घरापर्यंत पोहोचावं, तिनं घरात बोलावावं, मद्याचे दोन पेग व्हावेत, डान्स करावा आणि पुढे बरंच काही घडावं असं स्वप्न अनेकांना पडत असतं. दुबईहून परतलेला चित्रपटाचा नायक अल्बर्टचं स्वप्न ख्रिसमसच्या रात्री खरं होतं. अल्बर्टच्या बाबतीत वर सांगितलेलं सर्व घडतं. त्याला मारिया भेटते आणि ती त्याला घरीही बोलावते. दोघं ड्रींक करतात. डान्सही करतात. मग दोघे अल्बर्टच्या घरी जातात. तिथे वाईन पितात आणि पुन्हा मारियाच्या घरी परततात. त्यानंतर सुरू होतो रहस्याचा खरा खेळ...

लेखन-दिग्दर्शन :

चित्रपटाची कथा फ्रेडरीक दा यांनी लिहिलेल्या 'ला मोंटे चार्ज' या कादंबरीवर आधारलेली आहे. अगदी पहिल्या दृश्यापासून पटकथा कुतूहल निर्माण करण्याचं काम करते. सुरुवातीला काही ठिकाणी हसवते आणि हळूहळू गुंतागुंत निर्माण करते. समोर जे चाललंय ते कशासाठी याचा विचार करायला भाग पाडत उत्सुकता वाढवते. पहिला भाग व्यक्तिरेखांची ओळख आणि कथेचा विस्तार करण्यात गेला आहे, पण अखेरचा अर्धा-पाऊण तास जे काही सादर केलंय ते कमाल आहे. डिटेलिंग अफलातून आहे. ओळख, डान्स, आकर्षण, रोमान्सची सुरुवात यात थोडा जास्त वेळ गेलाय. डॅनियल जॉर्ज यांचं पार्श्वसंगीत आणि मधू नीलकंदन यांची सिनेमॅटोग्राफी नॉस्टेल्जियासोबतच आवश्यक रहस्यमय वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होतात. गीत-संगीत स्मरणात राहणारं नाही. 

अभिनय :

आपण एक उत्तम अभिनेता असल्याचं विजय सेतुपतीनं पुन्हा एकदा लहान-सहान बारकाव्यांसह सिद्ध केलं आहे. त्याचं कॅरेक्टर दाक्षिणात्य दाखवल्याने दाक्षिणेकडील शैलीतील त्याचे हिंदी उच्चार खटकत नाहीत. कतरीना कैफकडून खूप अपेक्षा होत्या, पण इतकी वर्षे होऊनही तिला हिंदीवर प्रभुत्व मिळवत अचूक संवादफेक करणं जमलेलं नाही. चेहऱ्यावरील हावभावांसाठी आणखी मेहनत घेणे आवश्यक होतं. विनय पाठकने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका चांगली साकारली आहे. राधिका आपटेचं कॅरेक्टर छोटं आहे. संजय कपूर, अश्विनी काळसेकर, प्रतिमा काझमी सहाय्यक भूमिकांमध्येही लक्षात राहतात.

सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शननकारात्मक बाजू : मध्यंतरापूर्वीच्या भागातील गती, गीत-संगीतथोडक्यात काय तर एका रोमांचकारी प्रवासावर नेणारा हा रहस्यमय प्रवास एकदा वेळ काढून पाहायला हवा.

टॅग्स :कतरिना कैफTollywoodसिनेमा