Join us  

आधुनिक काळातील पती-पत्नीच्या नात्यातील गुंतागुंत, कसा आहे विद्या बालनचा दो और दो प्यार?

By संजय घावरे | Published: April 19, 2024 3:36 PM

विद्या बालनचा नुकताच रिलीज झालेला 'दो और दो प्यार' सिनेमा कसा आहे? वाचा Review (do aur do pyaar)

Release Date: April 19, 2024Language: हिंदी
Cast: विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ, सेंथिल राममूर्ती
Producer: समीर नायर, दीपक सहगल, तनुज गर्ग, अतुल कसबेकर, स्वाती अय्यर चावलाDirector: शीर्षा गुहा ठाकूरता
Duration: दोन तास १९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

दिग्दर्शिका शीर्षा गुहा ठाकूरता यांनी या चित्रपटात आजच्या काळातील पती-पत्नीला आरसा दाखवत नात्यातील गुंतागुंत आणि असुरक्षितता यावर भाष्य केलं आहे. कोणतंही नातं 'ब्रेक' करण्यापूर्वी थोडा 'ब्रेक' घेऊन एकमेकांना वेळ दिल्यास त्या नात्याला पुन्हा नवपालवीचे धुमारे फुटू शकतात असा मोलाचा संदेश यात आहे.

कथानक : चित्रपटाची कथा बंगाली अनिरुद्ध बॅनर्जी आणि दाक्षिणात्य काव्या गणेशन या जोडप्याभोवती गुंफण्यात आली आहे. १२ वर्षांपूर्वी दोघांनी कुटुंबियांचा विरोध पत्करून एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातलेली असते. वर्तमानात मात्र दोघांमध्ये दुरावा आलेला आहे. फोटोग्राफर विक्रम हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे, तर नोरा ही अनीची गर्लफ्रेड आहे. अनी-काव्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर असताना काव्याच्या आजोबांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंत्यविधीसाठी दोघेही उटीला जातात, पण परतताना मात्र दोघांचेही स्वभाव कमालीचे बदललेले असतात. त्यानंतर पुढे काय घडतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : वनलाईन सुरेख असून, पटकथा लिहिताना थोड्याफार नाट्यमय वळणांचा समावेश करण्यात आला आहे. नात्यांमधील मूड चांगल्या प्रकारे सादर करण्यात आले आहेत, पण संथ गतीचा फटका चित्रपटाला बसला आहे. कथानक फार मोठं नसल्याने आणि फार काही घडत नसल्याने दोन तासांमध्ये आटोपतं घेणं गरजेचं होतं. दोघांनीही नवीन साथीदारांसोबत नवा डाव मांडण्याची तयारी केलेली असताना एकमेकांबद्दल त्यांना काहीच माहित नसणं ही अतिशयोक्ती वाटते. क्लायमॅक्समध्ये एकमेकांचं रहस्य अत्यंत सहजगत्या उलगडलं असून, त्यानंतरचं भांडणही सयंतपणे मांडण्यात आलं आहे. पार्श्वसंगीतामध्ये ताजेपणा जाणवतो.

अभिनय : विद्या बालनचं वय दिसू लागलं असलं तरी क्षणार्धात चेहऱ्यावरचे भाव बदलण्याची कला तिला चांगलीच जमते, जिचा सुरेख वापर तिने या चित्रपटातही केला आहे. पुन्हा एकदा सहजसुंदर अभिनय करणाऱ्या प्रतीक गांधीने एकीकडे आपल्या व्यक्तिरेखेतील दुहेरी छटा सादर केल्या आहेत, तर दुसरीकडे विनोदनिर्मितीचं कामही चोख बजावलं आहे. त्या तुलनेत इलियाना डिक्रूझ फारशी प्रभावी वाटली नाही. सिंथेल राममूर्तीचा प्रयत्न चांगला असला तरी सर्वसामान्यांना इंग्रजी संवाद समजण्यासाठी कॅप्शनची गरज भासणार आहे. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीतनकारात्मक बाजू : संथ गती, संकलन, लांबीथोडक्यात काय तर पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारे आजवर बरेच सिनेमे आले असले तरी हा चित्रपट काही वेगळे पैलू सादर करणारा असल्याने एकदा पाहायला हवा.

टॅग्स :विद्या बालनइलियाना डीक्रूजबॉलिवूड