राम चरण तेजा आणि काजल अग्रवाल यांच्या मगधीरा या सुपरहिट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येणार असून, या चित्रपटासाठी शाहिद कपूरचे नाव निश्चित झाले आहे. मगधीराचा रिमेक साजीद नादियाडवाला बनवणार आहे. या चित्रपटाच्या प्रि प्रोडक्शनचे काम सध्या सुरू असून शाहिद कपूरचे नाव निश्चित झाल्याचे साजीदने सांगितले. चित्रपटाचे शूटिंग लवकरात लवकर सुरू होणार असून पुढील वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज करण्याचा साजीदचा बेत आहे. मगधीरा हा चित्रपट 17 व्या शतकातील प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस. राममौली यांनी केले होते. विशेष म्हणजे मगधीराचे अधिकार यापूर्वी विकास बहल आणि अनुराग कश्यप यांनीही खरेदी केले आहेत. चित्रपटासाठी शाहिदच्या आधी हृतिक आणि रणबीर कपूरच्या नावावर विचार करण्यात आला होता. पुढे शाहिदचे नाव निश्चित झाले.