नसीरुद्दीन शाहज्येष्ठ अभिनेते
मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो, तेव्हा गिरीश कर्नाड इन्स्टिट्यूटचे संचालक होते. काही कारणांमुळे त्यांच्याशी काहीसा खोडसाळपणा झाला होता. त्यानंतर आम्हाला दिल्लीला पाठवण्यात आले. तिथे मी एका नाटकात काम केले. योगायोगाने ते नाटक पाहण्यासाठी गिरीश कर्नाडही आले होते. त्यांना ते खूप आवडले. त्यावेळी श्यामसाहेब ‘निशांत’ चित्रपटासाठी धाकट्या भावाच्या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराच्या शोधात होते. गिरीश यांनी बेनेगलांना माझ्याबाबत सांगितले. ते बेनेगलांना म्हणाले की, एक ॲक्टर आहे; पण तो अतिशय उद्धट, आगाऊ आणि विचित्र आहे. त्यामुळे थोडे सांभाळून राहा. इतके सांगूनही श्यामसाहेबांनी मला भेटण्यासाठी घरी बोलावले.
मी वेळेपूर्वी तिथे पोहोचलो. संगम बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी पहिला मजला चढत असताना माझे पाय थरथर कापत होते. बेल वाजवली, तेव्हा नीरा वर्तमानपत्र वाचत होत्या. मला बोलावल्याचे सांगितल्यावर नीराने माझ्याकडे पहिले आणि उसासा सोडला. भीतीने माझा असा थरकाप उडाला होता. थोडा वेळ मी एकटाच बसून होतो. काही वेळाने मला जाणवले की, श्यामसाहेब बेडरूमच्या दरवाजात उभे होते. त्यांना पाहिले अन् मी लागलीच उठून त्यांच्याजवळ गेलो. त्यांना हात मिळवताच माझ्या मनातील भीती पळून गेली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अशी काही अनोखी शक्ती होती की, जी मी शब्दांत सांगू शकणार नाही. ते समोरच्याला एकदम कम्फर्टेबल करायचे. जेव्हा एखाद्या ‘गॉडमॅन’ने तुम्हाला आलिंगन द्यावे आणि अतिशय समाधानाची अनुभूती यावी, तशी जाणीव मला त्यांना भेटल्यावर झाली.
त्यांची दुसरी गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आमचे नाट्यप्रशिक्षण वेगळ्या प्रकारे झाले होते. वेगळ्या प्रकारे अभिनय करायला आम्हाला शिकवले गेले होते. मला ते खूप भावलेही होते; पण ज्याप्रकारे हिंदी चित्रपट बनतात, तिथे ज्या प्रकारे कामाची गरज असते ते पाहता याचा वापर कुठे करायचा, हे समजत नव्हते. श्यामसाहेबांना भेटण्यापूर्वी फिल्म इन्स्टिट्यूटच्या पहिल्या वर्गात शिकताना कानपूरमध्ये एका मित्रासोबत ‘अंकुर’ चित्रपट पाहिला होता. तो पाहिल्यावर माझ्या स्वप्नांना जणू पंखच फुटले. अशा चित्रपटांमध्ये आपल्याला काम मिळू शकते, असे वाटले. श्यामसाहेबांनी मला समजावले की, ज्याप्रमाणे तू नाट्यगृहात उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांशी नाते जोडतोस, तसेच नाते कॅमेऱ्यासोबत जोडायला शिक. कॅमेऱ्याला घाबरू नकोस, तो तुझा मित्र आहे. हा त्यांचा सल्ला माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला.
दहा दिवसापूर्वी, १२ डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते कुणाल कपूर, कुलभूषण खरबंदा, नसीरुद्दीन शाह, रजित कपूर, दिव्या दत्ता, शबाना आझमी कलाकारांनी श्याम बेनेगलांचा ९०वा वाढदिवस साजरा केला हाेता.