Join us

‘रामायण’चा वर्ल्ड रेकॉर्ड; त्या एका एपिसोडने रचला अनोखा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 15:26 IST

16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय होते खास?

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित झाली आणि एकापाठोपाठ एक विक्रम नोंदवले गेलेत. 90  च्या काळात ‘रामायण’ सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव 2020 मध्येही येतोय. टीआरपीच्या चार्टमध्ये ‘रामायण’ या पौराणिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहेच.  आता ‘रामायण’ने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. होय, 16 एप्रिलला प्रसारित झालेल्या ‘रामायण’च्या एपिसोडने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. 16 एप्रिलचा हा एपिसोड 7.7 कोटी लोकांनी पाहिला. यानंतर ‘रामायण’ ही जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली.

‘रामायण’ या पौराणिक मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ‘रामायण’ पुन्हा सुरु झाले आणि टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल स्थानी पोहोचली. 2015 ते आत्तापर्यंत सर्वाधिक टीआरपी मिळवणारा हा पहिला हिंदी जनरल एंटरटेनमेंट शो ठरला होता. आता या मालिकेले वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.

16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय होते खास?16 एप्रिलचा ‘रामायण’ने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हा एपिसोड 7.7 कोटी लोकांनी पाहिला. आता या एपिसोडमध्ये असे काय खास होते, काय दाखवले होते, असा प्रश्न काहींना पडू शकतो. तर यात लक्ष्मणासाठी संजीवनी आणायला गेलेला हनुमान संजीवनी न मिळाल्याने अख्खा कैलाश पर्वत हातावर उचलून आणल्याचे दाखवण्यात आले होते.  यानंतर सुषैण वैद्य लक्ष्मणाला संजीवणी देतो आणि लक्ष्मण शुद्धीवर येतो, अशी कथा या एपिसोडमध्ये दाखवण्यात आली होती.

टॅग्स :रामायण