सदाशिव अमरापूरकर हे रंगभूमीतून आलेले. अर्थात त्यांचे पहिले प्रेम हे रंगभूमी हेच होते. गोविंद निहलानींचा ‘अर्धसत्य’ हा त्यांचा पहिला चित्रपट. रंगकर्मी विजय तेंडुलकरांनी अमरापूरकरांना निहलानींची भेट घ्यायला सांगितले. कारण त्या वेळी निहलानी ‘रामा शेट्टी’च्या शोधात होते. अर्धसत्य या चित्रपटातील नामचिन गुंडाची ही भूमिका अवघ्या २०-२५ मिनिटांची; परंतु निहलानींना ‘रामा शेट्टी’ काही मिळत नव्हता. तेंडुलकरांच्या सांगण्यावरून सदाशिव अमरापूरकर निहलानींना भेटले. पहिल्याच भेटीत त्यांना ‘रामा शेट्टी’ मिळाला. अमरापूरकरांचे भेदक डोळे ‘रामा शेट्टी’त त्यांना दिसू लागले. तरीही अमरापूरकरांनी त्यांना त्यांचे एक नाटक पाहण्यास सांगितले. निहलानी हे नाटक पाहण्यास गेले; पण ते विनोदी नाटक होते. तरीही निहलानींनी अमरापूरकरांना ‘रामा शेट्टी’ची आॅफर दिली आणि जेमतेम २० मिनिटांची ही भूमिका सदाशिव अमरापूरकरांनी अजरामर केली. फिल्मफेअरचे पहिले पारितोषिक त्यांच्या या भूमिकेला मिळाले. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नायक, खलनायक, विनोदी अभिनेते अशा विविध रूपांत त्यांनी अभिनयदर्शन घडवले. पोलिसाच्या जीवनावर बेतलेला ‘अर्धसत्य’ ओमपुरीचा कर्तव्यकठोर इन्स्पेक्टर व सदाशिव अमरापूरकरांचा नामचिन गुंड रामा शेट्टी व मायाळू पण वज्रनिश्ययी पिता अमरीश पुरी यांच्या अभिनयाने चांगलाच गाजला होता.
भेदक डोळ्यांचा रामा शेट्टी
By admin | Updated: November 4, 2014 01:44 IST