Join us  

Ram Gopal Varma : राजामौली यांच्या हत्येचा रचला जातोय कट ? राम गोपाल वर्मा यांचं धक्कादायक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 9:27 AM

अनेक फिल्ममेकर्स राजामौली यांच्या हत्येचा कट रचत आहेत मीही त्यांच्यात सामील आहे, राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने खळबळ

Ram Gopal Verma : चित्रपटसृष्टीत सध्या दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे. त्यातही 'एस एस राजामौली' (S S Rajamouli) यांनी एकापेक्षा एक चित्रपट देत भारतीय सिनेसृष्टीचे नाव उंचावले आहे. राजामौली यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार धडपडत आहे. दरम्यान इतर दिग्दर्शकांना राजामौली यांच्याबद्दल चांगलीच इर्षा (Jealousy) वाटत असून त्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचं दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलंय. 

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने खळबळ उडवली आहे. त्यांनी हे ट्विट नशेत केल्याचंही म्हणलंय. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'हॅलो राजामौली सर, मुघले आजम (Mughal E Azam) बनवणाऱ्या के आसिफ (K Asif) यांच्यापासून ते शोले (Sholay) च्या रमेश सिप्पी आणि सध्याचे आदित्य चोप्रा, करण जोहर आणि भन्साळी सर्वांनात तुम्ही मागे टाकले आहे. मला तुमचे चरणस्पर्श करायचे आहेत. एका भारतीय सिनेमा इतकी मोठी मजल मारेल असा विचार दादासाहेब फाळके यांच्यापासून ते आतापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कोणीच केला नसेल. अगदी स्वत: राजामौली यांनाही वाटलं नसेल की त्यांना इतकं मोठं यश मिळेल.

 आणखी एक ट्वीट करत त्यांनी लिहिले, 'आणि सर, तुमच्या सुरक्षितेत वाढ करा कारण काही फिल्ममेकर्स केवळ इर्षेतून तुमची हत्या करायचा कट करत आहेत. त्यात मीही सामील आहे. मी नशेत असल्याने हे सिक्रेट उघड करत आहे.' 

राजामौली यांच्या कामामुळे प्रभावित होत राम गोपाल वर्मा यांनी हे ट्वीट केलेलं दिसतंय. राजामौलींचं कौतुकही राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्याच विचित्र स्टाईलमध्ये केलंय. राजामौली आणि जेम्स कॅमेरुन यांची भेट झाली तो व्हिडिओ राम गोपाल वर्मा यांनी शेअर करत त्यावर हे कॅप्शन ट्वीट केलं आहे. 

एस एस राजामौली यांच्या आधी बाहुबली (Bahubali) आणि आता आरआरआर (RRR) सिनेमाने जागतिक स्तरावर यश मिळवले. RRR चित्रपटातील गाण्याला तर 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड' मिळाला. तसंच नुकतंच सिनेमाने 'क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड'ही पटकावला आहे. आता राजामौली यांचा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत दाखल झाला आहे. ही भारतीय सिनेसृष्टीसाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

टॅग्स :राम गोपाल वर्माएस.एस. राजमौलीट्विटरआरआरआर सिनेमा