सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे जगभरात चाहते आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये ज्याप्रकारे अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खानच्या घरी चाहत्यांची गर्दी जमते तसंच रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहते जमतात. कोणताही सण असो किंवा अभिनेत्याचा वाढदिवस चाहते येतातच. मात्र या चाहत्यांचा कल्ला रजनीकांत यांच्या शेजाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. नुकताच त्यांनी या विरोधात आवाज उठवला आहे.
रजनीकांत यांचा वाढदिवस असो किंवा पोंगल, दिवाळी असे सण, प्रत्येक खास दिवशी थलायवाच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा होते. रजनीकांतही चाहत्यांना निराश न करता घरावरील गार्डन एरियात येत सर्वांना अभिवादन करतात. यासाठी चाहते तासनतास रजनीकांतची वाट पाहत बाहेर उभे असतात. मात्र चाहत्यांच्या आवाजामुळे शेजाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. सततच्या आवाजामुळे त्यांचीही गैरसोय होते. सुट्टीच्या दिवशी तर उलट जास्त गर्दी होत असल्याने आता मात्र शेजारी भडकले आहेत.
रजनीकांत यांच्या शेजारची मंडळी काल बाहेर आली आणि त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली. यात एका महिलेचा आवाज जास्त होता. संतापून ती म्हणाली,'प्रत्येक सणाला सकाळपासूनच लोकांची गर्दी जमा होते आणि जोरजोरात आवाज असतो. सुट्टीच्या दिवशीही घरात आराम करता येत नाही. रजनीकांत यांनी कुठेतरी दूर जाऊन आपल्या चाहत्यांना भेटावं.'
22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी रजनीकांत यांना आमंत्रण मिळालं असून ते उपस्थित राहणार आहेत.