Join us  

अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 1:26 PM

Laila khan: 'या' एका कारणामुळे सावत्र वडिलांनीच केली लैलाची हत्या, संपूर्ण कुटुंबालाही केलं गायब

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या एकाच गोष्टीची चर्चा रंगलीये. गुरुचरण सिंह यांच्यापूर्वी अभिनेता विशाल ठक्करदेखील अचानक गायब झाला होता. त्यामुळे सध्या कलाविश्वातील अचानक गायब झालेल्या कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यामध्येच आता एक बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत आली आहे. जी अचानक गायब झाली आणि ११ महिन्यांनी चक्क तिच्या हाडांचा सांगाडा मिळाला.

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री लैला खान (Laila khan)  हीदेखील अशाच प्रकारे अचानक गायब झाली होती. लैला तिच्या कुटुंबासोबत फार्महाऊसवर सुट्टी एन्जॉय करायला गेली होती. मात्र, इकडून ती अचानकपणे बेपत्ता झाली.तिचा शोध घेतल्यानंतर तिचा हाडांचा सापळा सापला. इतकंच नाही तर तिची हत्या तिच्या सावत्र वडिलांनी केल्याचा मोठा खुलासाही यावेळी झाला होता.

राजेश खन्नाने केलं होतं इंडस्ट्रीत लॉन्च

लैलाने राजेश खन्ना यांच्या वफा या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात लैला आणि राजेश खन्ना यांचे बरेच बोल्ड सीन होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला पण लैलाने बरीच लोकप्रियता मिळवली. ३० जानेवारी २०११ रोजी लैलाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिने बांग्लादेशी असलेल्या मुनिर खान यांच्यासोबत लग्न केलं.

फार्महाऊसवर गेलेली लैला कधी परतलीच नाही

लग्न केल्यानंतर त्याच रात्री लैला, तिची आई सेलिना, मोठी बहीण हश्मीना, चुलत बहीण रेशमा आणि अन्य दोन जुळ्या भावंडांसोबत तिच्या फार्महाऊसवर इगतपुरी येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली.याच काळात ९ फेब्रुवारी रोजी लैलाच्या आईने तिच्या बहिणीला फोन करुन ती पती परवेज इक्बालसोबत चंदीगढमध्ये असल्याचं सांगितलं त्यानंतर अचानकपणे लैला खानसोबत तिचे सगळे कुटुंबीय रातोरात गायब झाले. लैलाच्या आईने तीन लग्न केली होती, आणि लैला सेलिनाच्या पहिल्या पतीची मुलगी होती.

११ महिने पोलीस घेत होते लैलाचा शोध

लैला आणि कुटुंबीय बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी बरेच महिने त्यांचा शोध घेतला. पण, काहीच पत्ता लागत नसल्यामुळे त्यांना परवेजवर (लैलाचे सावत्र वडील) संशय आला. त्यांनी मुंबई पोलिसांकडे लैलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. त्यांच्यासोबतच दिग्दर्शक राकेश सावंत यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कारण, लैला त्यांच्या सिनेमात काम करणार होती. मात्र, ती बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या सिनेमाचं चित्रीकरण अर्ध्यावर रखडलं होतं. पोलिसांनी शोध घेत असतांना २१ जून २०१२ मध्ये त्यांना परवेज विरोधात काही पुरावे सापडले आणि त्यांनी परवेजला अटक केली. यावेळी परवेजने केलेला खुलासा ऐकून सगळे जण थक्क झाले होते.

सावत्र वडिलांनीच केली लैलाची हत्या

परवेजने, लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. तसंच फार्महाऊसच्या केअर टेकरच्या मदतीने त्याने सगळ्यांचे मृतदेह फार्महाऊसमध्येच गाडले. परवेजने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लैलाच्या फार्महाऊसमधून ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या कारणामुळे केली लैलाची हत्या 

लैलाची आई कायम त्याचा अपमान करायची. तसंच तिचे अन्य पुरुषांसोबतही संबंध होते. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी लैलाच्या आईला मारलं. मात्र, आईचा खून होतांना लैलाने पाहिलं होतं. त्यामुळे परवेजने लैलाचाही खून केला.

टॅग्स :बॉलिवूडराजेश खन्नातारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीसिनेमा