Join us  

प्रसाद ओकने व्यक्त केली शरद पवारांवर बायोपिक बनवण्याची इच्छा, म्हणाला, "ते महाराष्ट्रातील..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 9:00 AM

प्रसाद ओकला करायचा आहे शरद पवारांवर बायोपिक, व्यक्त केली इच्छा

प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या प्रसादने मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक नाटक, सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने अभिनयाबरोबरच सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे.  अनेक सिनेमे त्याने दिग्दर्शित केले आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू', 'हिरकणी', 'चंद्रमुखी' हे सिनेमे प्रचंड गाजले. आता प्रसाद ओकने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "कोणावर बायोपिक करायला आवडेल?" असा प्रश्न प्रसादला मुलाखतीत विचारण्यात आला होता. "अशा बऱ्याच भूमिका आहेत. ज्या मला साकारायला आवडतील. मला सदाशिवराव पेशवेंची भूमिका साकारायला आवडेल. अण्णा हजारे, वपु काळे, जब्बार पटेल साकारायला आवडतील. शरदचंद्रजी पवार यांची भूमिका साकारायला आवडेल. त्यांचा बायोपिक दिग्दर्शित करायला आवडेल. ते महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत," असं प्रसाद ओक 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.  

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर' सिनेमा प्रचंड गाजला. आनंद दिघे यांचा जीवनपट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला होता. या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमराठी अभिनेता