Prajakta Mali On How Nonveg Harm: गेल्या दशकभरात शाकाहारी होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अधिकाधिक लोक मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळत आहेत.सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी चांगल्या आरोग्यासाठी मांसाहार सोडल्याचं सांगितलं आहे. या यादीत आता महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी (Prajakata Mali) हीदेखील येते. प्राजक्ता ही पुर्वी मांसाहार होती. पण, आता ती शाकाहारी झाली आहे. प्राजक्ताची एक मुलाखत सध्या व्हायरल होत असून तिने त्यामध्ये नॉनव्हेज का सोडलं या मागचं कारण सांगितले.
प्राजक्ता माळीनं 'लोकमत सखी'ला दिलेल्या मुलाखतीत मांसाहार सोडल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "मी शाकाहारी आहे. मांसाहार करणाऱ्या लोकांचा मी विरोध करत नाही. त्यामुळे माझ्यावर चिडू नका. पण एक उदाहरण सांगेन की, आपल्या शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी ७२ तास लागतात. प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही. बरं हे मी सांगत नाहीये, यावर अनेक डॉक्युमेंट्रीज सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मी आधी नॉनव्हेज खायचे, मग त्यानंतर सोडलं".
प्राजक्ताच्या शाकाहारी आहार घेण्याच्या निर्णयानंतर तिच्या फिटनेसवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट काय खावे आणि किती प्रमाणात खावे याबद्दल ती अधिक जागरूक झाली आहे. यापुर्वी एका मुलाखतीत प्राजक्तानं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी केल्याचं सांगितलो होतं. तसेच ती म्हणाली होती, "आपल्या प्रदेशात जे पिकतं आपण तेच खाल्लं पाहिजे. गहू आपल्याकडे पिकत नाही. त्यामुळे आपण भाकरी खाल्ली पाहिजे. ताक, कोशिंबीर आपल्या आहारात असलं पाहिजे. रात्री ८ नंतर मी जेवत नाही. रात्री भूक लागली तर मग मी ड्रायफ्रूट्स किंवा राजगिराचा लाडू खाते".
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'चिकी बुबूम बुम' (Chiki Chiki Booboom Boom) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रार्थना बेहेरे (prarthana behre), प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशा कलाकारांची तगडी फळी चित्रपटात पाहायला मिळाली. याआधी ती 'फुलवंती' सिनेमात दिसली होती या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच तिने निर्मिती बाजूही सांभाळली होती. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.