Join us

जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर प्रज्ञा दया पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:50 IST

कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मराठी अभिनेताचिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करतोय. चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे लोकांनी त्याला अत्यंत खालच्या पातळीला जाऊन ट्रोल केलं. सततच्या ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकर यांनी एक पोस्ट करत यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. आता यातच कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

कवयित्री प्रज्ञा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहलं, 'मुळात फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही. त्या भूमिकांच्या संहितांचं सांस्कृतिक राजकारण बेदखल करून त्यांचा अजेंडा पुढे नेला तर गत अशी काहीच्या बाही होऊन बसते. भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? देशाची गंगा-जमनी तहजीब, बहुलतावादी संस्कृती उंचावणारी आहे, की ती नष्ट करुन अल्पसंख्यांकादि अन्यांप्रती तिरस्कार आणि घृणा निर्माण करणारी आहे, याचा निर्णय कलावंत म्हणून कधीतरी घ्यावाच लागतो'.

पुढे त्यांनी लिहलं, 'उगीच नाही; 'पार्टनर, तेरी पाॅलिटिक्स क्या है' हा प्रश्न विचारला होता गजानन माधव मुक्तिबोधांनी.. बाकी पूर्ण सहानुभूती आहेच! जे घडतंय ते अतिशय विदारक आहे. अखलाकला ठेचून मारलं केवळ फ्रीजमध्ये बीफ असावं, या संशयामुळे.. मोहसीनला पुण्यात हकनाक संपवलं..ही अशी कैक उदाहरणं.  त्यावेळीही जाहीर बोललं गेलं असतं तर बरं झालं असतं. काळ माफ करत नसतो!! ...जहांगीरच्या कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत त्यातून तो बरंच काही शिकेल. कदाचित तो अधिक व्यापक होईल. कदाचित अधिक सहिष्णु. तसं त्यानं व्हावं हीच सदिच्छा!!'.

चिन्मय मांडलेकर यांचा मुलगा जहांगीर हा 11 वर्षांचा आहे. चिन्मयने अलिकडेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या मुलाचा जहांगीरचा उल्लेख केला होता. चिन्मयच्या मुलाचं नाव ऐकल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिचं मत मांडलं होतं. तसंच ट्रोलर्सला उत्तरं दिलं होतं. जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर चिन्मयच्या बाजूने अभिनेत्री गौतमी देशपांडे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह अनेक कलाकारांनी  अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. 

टॅग्स :चिन्मय मांडलेकरसेलिब्रिटीमराठी अभिनेता