ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 10 - बॉलिवूडमधील एव्हरग्रीन जोड्यांमधील एक म्हणजे शाहरुख आणि काजोलची जोडी. अनेक चाहत्यांच्या मनावर गेले कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणा-या या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ऑन स्क्रीन जबरदस्त केमिस्ट्री असणारी ही जोडी ऑफ स्क्रीन तितकेच चांगले मित्र आहेत. पण जेव्हा शाहरुख खान काजोलला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याला ती अजिबात आवडली नव्हती असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे, इतकंच नाही तर शाहरुखने आमीर खानला काजोलसोबत काम करु नकोस असा सल्लाही दिला होता.
एका एंटरटेनमेंट पोर्टलला शाहरुखने दिलेल्या मुलाखतीत शाहरुनने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल गप्पा मारताना ही माहिती दिली. 'मी बाजीगर चित्रपटात जेव्हा काजोलसोबत काम करत होतो, तेव्हा आमीरने माझ्याकडे काजोलबद्दल चौकशी केली होती. आमीर काजोलसोबत काम करण्यास उत्सुक होता. त्यावेळी ती चांगली नाही, फोकस नाही, तु तिच्यासोबत काम करु शकणार नाहीस असं आमीरला सांगितलं होतं', असं शाहरुखने सांगितलं आहे.
'पण नंतर पडद्यावर तिचा अभिनय पाहिल्यानंतर तिच्यातलं वेगळेपण जाणवलं. त्यानंतर मी सलग आमीरला फोन करुन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याला सांगितलं 'तिचा अभिनय पडद्यावर अतिशय उत्तम असून पडद्यावर तिची एक वेगळीच जादू आहे', असंही शाहरुख बोलला आहे.
शाहरुख खानच्या या आठवणीवर काजोलनेही आपली आठवण शेअर केली आहे. आमची नेमकी मैत्री कधी आणि कशी झाली सांगताना 'मला आठवतं शाहरुख आणि इतर अभिनेते सेटवर आले तेव्हा मी शाहरुख खानच्या मेकअपमनसोबत वाद घालत होते. त्यावेळी इतर सगळे का कसला आवाज आहे पाहत होते. त्यांचं डोकं दुखत असावं. शाहरुख अतिशय चिडला होता, पण तरीही मी माझं बोलणं सुरु ठेवलं होतं. शेवटी शाहरुख चिडला आणि म्हणाला प्लीज शांत बस आणि अशाप्रकारे आमच्या मैत्रीला सुरुवात झाली', अशी आठवण काजोलने सांगितली आहे.
दैनंदिन जीवनात काजोलशी चर्चा होत नसल्याचे शाहरुख सांगतो. मात्र, जेव्हा आमची होते, तेव्हा रंगतदार चर्चा होते. काजोलचं व्यक्तिमत्त्व अतिशय बोलकं आहे. काजोललाही एका मुलाखतीत गेल्या 20 वर्षात शाहरूखमध्ये बदल झाले आहेत का? असे विचारले. तेव्हा तिने, ''आम्ही सर्व कलाकार आहोत. आमच्यात वेळेनुसार बदल होतो. शाहरूख एक उत्तम कलाकार आहे. मला त्याच्यासोबत काम करायला आवडतं, असे तिने सांगितले होते.
काजोल आणि शाहरुखची जोडी असेल तर चित्रपट सुपरहिट होणार हे ठरलेलं गणित. आतापर्यंत दोघांनी सहा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामधील दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा सर्वात जास्त हिट झालेला चित्रपट. दिलवाले हा दोघांचाही शेवटचा चित्रपट...दिलवाले चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केली नाही, मात्र शाहरुख - काजोलची जोडी नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.