लिओ एक सच्चा पर्यावरणवादी - नकुल कामटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 16:02 IST
हॉलीवूड सुपरस्टार लिओनार्दो डिकॅप्रियो खरंच पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापासून काम करतोय. निसर्गाप्रती त्याचे प्रेम बेजोड आहे, असे नकुल कामटे म्हणाला. ...
लिओ एक सच्चा पर्यावरणवादी - नकुल कामटे
हॉलीवूड सुपरस्टार लिओनार्दो डिकॅप्रियो खरंच पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापासून काम करतोय. निसर्गाप्रती त्याचे प्रेम बेजोड आहे, असे नकुल कामटे म्हणाला. नकुलने लिओ अभिनित व निर्मित ‘बीफोर द फ्लड’ डॉक्युमेंटरीमध्ये साउंड इंजिनिअर म्हणून काम केले आहे.तो सांगतो, ‘सुरुवातीला मला स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या की, लिओशी बोलायचे नाही की जास्त वेळ त्याच्याकडे पाहायचे नाही. हे सर्व त्याच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या काळजीपोटी होते. परंतु कामाच्या ओघात माझ्यावर विश्वास वाढल्यानंतर सर्व रिलॅक्स झाले.वातावरणात होणाऱ्या बदलांविषयीच्या या माहितीपटात लिओने जगभर फिरून शेतकरी, निसर्गप्रेमी, पर्यावरण कार्यक र्ते, राजकीय नेते, तज्ज्ञांशी चर्चा केली. आॅस्कर विजेता फिशर स्टीव्हन्सने या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन केले आहे. नकुलने चित्रिकरणाच्या वेळी प्रत्यक्ष ठिकाणांवर साउंड व आॅडिओ मिक्सिंग केले. इन्सेटमध्ये नकुल कामटे बॉलीवूडमध्ये ‘लगान’, ‘रंग दे बसंती’सारख्या सिनेमांसाठी तो साउंड इंजिनिअर होता. ऐंशीच्या दशकात त्याने संगीतकार म्हणून एहसान नुरानीसोबत काम केलेले आहे. एका गाण्याची रेकॉर्डिंग न आवडल्यामुळे त्याने मिक्सिंग कशी करतात हे स्वत: शिकण्याचा निर्णय घेतला आणि तेथून पुढे त्याचा साउंड इंजिनिअर म्हणून प्रवास सुरू झाला.लिओसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, ‘त्याने या डॉक्युमेंटरीसाठी खूप मेहनत घेतली आहे. हा विषय त्याच्यासाठी केवळ छंद नाही. तो मनापासून हे काम करतो. याविषयीचे त्याला सखोल ज्ञान आहे. एकदा तर त्याने एका तज्ज्ञाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. तो एक सच्चा पर्यावरणवादी आहे.’ दोघांमध्ये कधी चर्चा झाली का? यावर तो सांगतो, ‘हो. त्याने मला पर्यावरणाविषयी काही प्रश्न विचारले. याच विषयावर आमचे बोलणे व्हायचे. पण माझ्या कॉन्ट्रॅक्टनुसार यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. फक्त एवढेच की, लिओ खासगी आयुष्यातही खूप कूल आहे.’