मॅडम तुसादमधील मधुबालाचा ‘नुरानी’ अंदाज पाहिलातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 12:10 IST
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री मधुबाला. हॉलिवूडमध्ये मर्लिन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदयाने ...
मॅडम तुसादमधील मधुबालाचा ‘नुरानी’ अंदाज पाहिलातं?
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री मधुबाला. हॉलिवूडमध्ये मर्लिन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदयाने तिचा काळ गाजवला, तसाच बॉलिवूडमध्ये लावण्यवती मधुबालाने आपला काळ गाजवला. भारतातच नव्हे तर हॉलिवूडपर्यंत मधुबालाच्या सौंदर्याची कीर्ती पोहोचली होती. त्यामुळेच जगप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा याने भारतात येऊन मधुबालाला हॉलिवूडमध्ये नेण्याचे प्रयत्न केले होते. सन १९५२ मध्ये अमेरिकेच्या ‘थिएटर आर्ट्स’ या मॅगझिनच्या कव्हरपेजवर मधुबाला झळकली होती. या कव्हरपेजने मधुबालाच्या सौंदर्याला वैश्विक मान्यता मिळवून दिली होती. मधुबाला आज आपल्यात नाही, पण तिच्या सौंदर्याची जादू आजही कमी झालेली नाही. भारतातील ही सर्वाधिक सुंदर अभिनेत्री आता दिल्लीच्या मॅडम तुसाद संग्रहालयात दिसणार आहे. काल मधुबालाच्या मेणाच्या पुतळा सर्वांसमोर सादर करण्यात आला. यावेळी मधुबालाची लहान बहीण मधुर ब्रिजही हजर होती. मधुबालाचा हा पुतळा लवकरच दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील मॅडम तुसाद संग्रहालयात ठवेण्यात येणार आहे. यावर्षीच्या अखेरिस हे संग्रहालय सर्वांसाठी सुरु होणे अपेक्षित आहे. मधुबालाचा हा मेणाचा पुतळा साकारणे सोपे नव्हतेच. अनेक महिने यासाठी संशोधन केले गेले. तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून, मधुबालाचे जुने फोटो, व्हिडिओ बघून हा पुतळा तयार करण्यात आला. तो तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. ‘अनारकली’च्या लूकमधील मधुबालाचा हा पुतळा म्हणजे अप्रतिम कलाकृती म्हणायला हवी. हुबेहुब मधुबाला आपल्यापुढे ‘अनारकली’ पोझमध्ये उभी आहे, असा साक्षात्कार हा पुतळा पाहून होतो. मधुबालाची बहीण मधुर ब्रिज ही सुद्धा हा पुतळा पाहून भावूक झाली. हा पुतळा नाही तर साक्षात माझी ‘आपा’ माझ्यापुढे उभी आहे, असे मला वाटतेय. जणू आत्ताच माझी ‘आपा’ माझ्याशी बोलायला लागेल, असे वाटतेय, असे मधूर यावेळी म्हणाली.