जाणून घ्या तुमच्या लाडक्या कलाकारांचा पहिला जॉब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:44 IST
त्यांच्याकडे आज बंगला आहे, गाडी आहे, ते सगळ्यात मोठे करदातेही असतील.. दुबई, अमेरिका अशा सातासमुद्रापारही त्यांचं येणं जाणं असतं. ...
जाणून घ्या तुमच्या लाडक्या कलाकारांचा पहिला जॉब !
त्यांच्याकडे आज बंगला आहे, गाडी आहे, ते सगळ्यात मोठे करदातेही असतील.. दुबई, अमेरिका अशा सातासमुद्रापारही त्यांचं येणं जाणं असतं. चंदेरी दुनियेतील बॉलीवुडच्या प्रसिद्ध स्टार्सकडे हे सगळं काही असेल. काहींना नशिबानं तर काहींनी मेहनतीनं कमावलं असेल. मात्र या सगळ्या कलाकारांचा पहिला जॉब काय असेल हे तुम्हाला माहिती आहे का..? मग त्यावरच एक नजर टाकूया.. रणदीप हुड्डा – अभिनेता रणदीप हुड्डाचे स्टार्स सध्या चांगलेच चमकतायत. एकामागून एक येणारे सिनेमा. बडे कलाकार आणि बड्या बॅनरसह काम करण्याचा अनुभव यामुळं रणदीपचा भाव चांगलाच वधारलाय.. 'हायवे', 'सरबजीत', 'जिस्म-2', 'मर्डर-3', 'किक', 'दो लफ्जो की कहानी' असे सिनेमा त्यानं केलेत. असं असलं तरी रणदीप आपल्या पहिल्या नोकरीला विसरलेला नाही. हा हरियाणावी तरुण शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता.. तिथे त्यानं काही काळ टॅक्सी चालवण्याची नोकरीही केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलीवुडच्या अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंत आहे. मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून यश मिळवलेल्या नवाजुद्दीनला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्याला केमिस्टच्या दुकानात नोकरी करावी लागली. त्यानंतर सिनेमात येण्याआधी त्यानं वॉचमन म्हणूनही नोकरी केलीय. शाहरुख खान – बॉलीवुडचा किंग खान, बॉलीवुडचा बादशाह खान. शाहरुख खानची ही ओळख आज सा-या जगाला माहित झालीय. मात्र त्यानं त्याच्या करियरची सुरुवात केली तेव्हा शाहरुख खान एवढीच त्याची काय ती ओळख होती. दिल्लीतल्या गाण्याच्या कॉन्सर्टला तो हजेरी लावत असे. त्यावेळी यासाठी त्याला 50 रुपये मोबदला मिळत असे. एकदा पंकज उदास यांच्या एका कॉन्सर्टसाठी शाहरुखला 50 रुपये मिळाले होते. याच पैशातून तो ताजमहाल पाहायला जात असे. 50 रुपयांच्या कमाईपासून सुरु केलेला शाहरुख मेहनतीच्या जोरावर बॉलीवुडचा बादशाह बनला आहे. शाहिद कपूर – शाहिद कपूर आज बॉलीवुडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक बड्या बॅनरचे सिनेमा त्याच्याकडे आहेत. पंकज कपूर यांचा मुलगा असलेल्या शाहिदनं विविध भूमिका साकारल्यात. मात्र त्याचा पहिला जॉब होता कोरियोग्राफर श्यामक दावर यांच्याकडे.श्यामक दावर इन्स्टिट्यूटमध्ये डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी केली. त्यानंतर शाहिदनं आपल्या वडिलांच्या ‘मोहनदास एलएलबी’ सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. प्रियांका चोप्रा – देसी गर्ल प्रियांका चोप्राचा डंका बॉलीवुडपासून थेट हॉलीवुडपर्यंत गाजतोय. अभिनय कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर प्रियांकानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या पहिल्या जॉबची कमाई म्हणून प्रियांकानं पाच हजार रुपये कमावले होते, ते तिनं खर्च केले नाही. ही सगळी कमाई तिनं आपल्या आईकडे दिली होती. ही सगळ्यात मोठी कमाई होती असं तिला आजही वाटतं. हृतिक रोशन – प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकनं पहिल्याच सिनेमात कमाल करत रसिकांवर मोहिनी घातली. मात्र अनेकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या हृतिकची पहिली कमाई 1980 साली झाली होती. 1980 मध्ये 'आशा' या सिनेमात हृतिकला बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यासाठी त्याला 100 रुपये इतका मोबदला मिळाला होता. आपल्या या पहिल्या कमाईपासून हृतिकनं टॉय कार खरेदी केल्या होत्या. रोहित शेट्टी – बॉलीवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शकांमधील एक नाव म्हणजे रोहित शेट्टी. दिलवाले, चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सिरीज अशा सिनेमाचं दिग्दर्शन रोहितनं केलंय. मात्र 1991 साली रोहितनं फूल और काँटे या सिनेमाच्या वेळी दिग्दर्शक संदीप कोहली यांच्यासह काम केलं होतं. असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी रोहितला त्यावेळी दररोज 35 रुपये मिळत असे. इरफान खान – अभिनेता इरफान खान यानं आपल्या अभिनयानं बॉलीवुडच नाही तर हॉलीवुडमध्येही काम केलंय. आपल्या अभिनयानं इरफाननं वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र इरफानची पहिली कमाई होती 25 रुपये. सिनेमात येण्याआधी तो ट्यूशन टीचर म्हणून काम करुन गुजराण करत असे. त्यासाठी त्याला प्रत्येक विद्यार्थ्याकडून 25 रुपये इतकी फी मिळत असे. cnxoldfiles/strong> – सुपरस्टार रजनीकांत.. दाक्षिणात्य रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे थलायवा. बॉलीवुडनंतर दाक्षिणात्य सिनेमातील अभिनयामुळं रजनीकांतला रसिकांनी देवाचा दर्जा दिला आहे. मात्र इथवर येण्यासाठी रजनीकांतला बराच संघर्ष करावा लागला. मूळचा शिवाजीराव गायकवाड असलेल्या रजनीकांतनं आधी मुंबईच्या बेस्ट बसमध्ये कंडक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची ओझी उचलत कुलीचं कामही केलं.