birthday special : एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने अंतर्बाह्य खचले होते जगजीत सिंह...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 11:12 IST
गझल सम्राट जगजीत सिंह आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी गायलेल्या अनेक अजरामर गझला आजही आपल्या मनात जिवंत आहेत. जगजीत ...
birthday special : एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने अंतर्बाह्य खचले होते जगजीत सिंह...!!
गझल सम्राट जगजीत सिंह आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी गायलेल्या अनेक अजरामर गझला आजही आपल्या मनात जिवंत आहेत. जगजीत आपल्यात असते तर आज (८ फेबु्रवारी) ७६ वर्षांचे असते. आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. जगजीत सिंह यांचा जन्म ८ फेबु्रवारी १९४१ रोजी राजस्थानच्या बिकानेर येथे झाला होता. त्यांचे जन्म नाव जगजीवन सिंह असे होते. जगजीत यांनी इंजिनिअर बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण जगजीत यांना संगीतात रस होता.पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगजीत यांनी आॅल इंडिया रेडिओ, जालंधरमध्ये गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले. याचदरम्यान गुरुद्वारात पंडित छगनलाल मिश्रा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. मार्च १९६५ मध्ये जगजीत सिंह कुणालाही न सांगता मुंबईला पळून गेलेत. येथे त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण याच मुंबईत त्यांना त्यांचे प्रेम मिळाले. येथे चित्रा दत्ता या बंगाली मुलीसोबत त्यांची ओळख झाली. चित्रा या आधीच विवाहित होत्या. चित्रा यांचे पती देबू प्रसाद दत्ता ब्रिटानिया बिस्कीट कंपनीत एका मोठ्या पदावर होते. देबू प्रसाद यांना साऊंड रेकॉर्डिंगमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी घरातच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला होता. एका रेकॉर्डिंगदरम्यान जगजीत व चित्रा यांची ओळख झाली आणि पुढे दोघेही चांगले मित्र झालेत. यापश्चात या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. असे म्हणतात की, जगजीत यांनी चित्रा यांच्या पतीलाच त्यांचा हात मागितला होता. पुढे चित्रा व देबू प्रसाद यांचा घटस्फोट झाला आणि १९६९ मध्ये चित्रा व जगजीत यांचे लग्न झाले. चित्रा व जगजीत यांनी अनेक गाणी एकत्र गायलीत.यानंतर जगजीत व चित्रा यांना एक मुलगा झाला. विवेक असे त्याचे नाव. विवेक १८ वर्षांचा असताना एका सडक दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. तरूण मुलाच्या मृत्यूचा धक्का चित्रा यांना सहन झाला नाही. यानंतर त्यांनी गाणे कायमचे सोडले. या घटनेने जगजीत यांनाही हादरवून सोडले. ते संगीताच्या दुनियेत परतले खरे. पण मुलाच्या मृत्यूने त्यांना पूर्णपणे बदलले. इतके की, त्यांच्या गाण्यांचा अंदाजही बदलला. त्यांना जवळून ओळखणाºयांच्या मते, जगजीत यांच्या प्रत्येक गझलेत मुलाच्या मृत्यूचे दु:ख व वेदना झिरपायची. सन २०११मध्ये जगजीत सिंह हे गुलाम अली यांच्यासोबत युकेमध्ये परफॉर्म करणार होते. मात्र cerebral hemorrhage मुळे २३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि ते कोमात गेलेत. १० आक्टोबर २०११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.