Birthday Special: असा झाला ‘जग्गू दादा’चा ‘जॅकी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 11:33 IST
‘जग्गू दादा’,‘भिडू’ अशा नावाने लोकप्रीय असलेला अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आज (१ फेबु्रवारी) वाढदिवस. त्याच्याच बद्दल काही रोचक माहिती ...
Birthday Special: असा झाला ‘जग्गू दादा’चा ‘जॅकी’!
‘जग्गू दादा’,‘भिडू’ अशा नावाने लोकप्रीय असलेला अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आज (१ फेबु्रवारी) वाढदिवस. त्याच्याच बद्दल काही रोचक माहिती खास तुमच्यासाठी...जॅकी श्रॉफ याचे पूर्ण नाव जयकिशन काकुभाई श्रॉफ असे आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. तर आई तुर्कस्थानी.-जॅकी मुंबईमध्ये मलबार हिल एरिया मध्ये तीन बत्ती भागात राहत होता. तुम्हाला हे ठाऊक नसेल पण अभिनेता आणि मॉडेल बनण्याआधी जॅकी त्या भागातला गुंड म्हणून ओळखला जायचा. जग्गू दादा म्हणून लोक त्याला ओळखायचे. जॅकी याबद्दल सांगतो, माझा भाऊ आमच्या एरियाचा खरा दादा होता. तो सर्वांची मदत करायचा. एकेदिवशी कुणाला तरी वाचवण्यासाठी पोहता येत नसूनही तो समुद्रात उतरला आणि माझ्या डोळ्यांसमोर बुडाला. भावाच्या मृत्यूनंतर वस्तीच्या भल्यासाठी काम करायचे असे मी ठरवले आणि भावाची जागा घेतली. इथून जग्गू दादाचा जन्म झाला. - एकदिवस बस टॉपवर बसची प्रतीक्षा करीत असताना एका माणसाने जॅकीला मॉडेलिंग करणार का? असा प्रश्न केला. त्यावर किती पैसे देणार, हा जॅकीचा प्रतिप्रश्न होता. यानंतर जॅकी मॉडेलिंग करू लागला. - एक दिवस जॅकी देवआनंद यांच्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटाचे शूटींग बघायला गेला. गर्दीत जॅकी उभा होता. पण गर्दीपेक्षा वेगळा दिसत होता. देवआनंद यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी जॅकीला जवळ बोलवले. एवढेच नाही तर त्याला एक लहानसा रोल आॅफर केला. अशाप्रकारे जॅकी मोठ्या पडद्यावर अवतरला. - यानंतर नशीबाने जॅकीला अशीच एक मोठी संधी दिली. बड्या स्टार्सचे नखरे पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी नवा चेहरा घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने जॅकीला ‘हिरो’ मिळाला. १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने जॅकीला खºया अर्थाने हिरो बनवले. सुभाष घई यांनीच जय किशन याला जॅकी हे नाव दिले . - अभिनयाची कारकिर्दीत प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जॅकीचे आयशा दत्त हिच्यावर प्रेम जडले. आयशा ही राजघराण्यातील आहे. जॅकी व आयशाची एका बसमध्ये नजरानजर झाली. तेव्हा आयशा केवळ १३ वर्षांची होती. ५ जून १९८७ रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले. आयशा लग्नानंतर चित्रपट निमार्ती बनली. दोघांनी मिळून एक मिडिया कंपनी पण चालवली. जिचे नाव जॅकी श्रॉफ एन्टरटेनमेंट लिमिटेड असे होते. जॅकीला दोन मुले आहेत. एक बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा. - जॅकीने अनेक हिट सिनेमे दिलेत. ‘अंदर-बाहर’, ‘जानू’ आणि ‘युद्ध’ तसेच ्न‘१०० डेज’ जे खूप गाजलेत. १९८६ मध्ये रिलीज झालेला ‘कर्मा’ हा जॅकीचा चित्रपट तुफान गाजला. त्याचे ‘काश’,‘दहलीज’ आणि ‘सच्चे का बोलबाला’ हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालले नाहीत. पण त्यांच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली.- जॅकीला स्वयंपाकात प्रचंड रूची आहे. एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करण्याची त्याची इच्छा होती. पण डिग्री नसल्याने तो हे करू शकला नाही.