सेम टू सेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 14:12 IST
जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही ...
सेम टू सेम
जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या आमच्या अगदी परिचयाचे आहे. त्यांच्या चेह-याकडे पाहून तुम्हालाही त्यांच्यात साम्य जाणवेल. या व्यक्ती म्हणजे बॉलिवुडचे काही प्रसिद्ध कलाकार. या कलाकारांचे सेम टू सेम वाटावे असे चेहरेसुद्धा बॉलिवुडमधलेच. पाहूयात कोण आहेत बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार रिना रॉय आणि सोनाक्षी सिन्हा ‘शीशा हो या दिल हो’ हे गाणं रुपेरी पडद्यावर गाताना दिसलेल्या आशा सिनेमातल्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रिना रॉय. नागिन, जानी दुश्मन, जख्मी अशा एकाहून एक सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्या काळी रिना रॉय आणि शॉटगन अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरच्या चर्चाही तितक्याच रंगल्या. त्यामुळंच की काय दबंग सिनेमात शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा रज्जो म्हणून रुपेरी पडद्यावर अवतरली, त्यावेळी सोनाक्षी ही रिना रॉय यांची कार्बन कॉपी अर्थात सेम टू सेम असल्याच्या चर्चा रंगल्या. इतकंच नाही तर अनेकांनी शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांच्या अफेअरचा धागा पकडत सोनाक्षीला त्यांची लेक बनवून टाकलं. रिना रॉय आणि सोनाक्षी यांच्या चेह-यात इतकं काही साम्य आहे की या चर्चा आपसुकच रंगू लागल्या. मात्र खुद्द शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी आणि रिना रॉय यांनी या सगळ्या गोष्टींचा इनकार केला. मात्र आजही दोघींच्या चेह-यांमधलं साम्य सहज पाहता येईल. मधुबाला आणि माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये ज्यांचं नाव सर्वोच्च स्थानी आहे अशा अभिनेत्री म्हणजे मधुबाला. त्यांच्या सौंदर्यासह त्यांचा अभिनय, नृत्य, अदा याची कायमच चर्चा झाली. मधुबाला यांच्यासारखं सौंदर्यच नाही तर त्यांच्यासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने. या दोन्ही अभिनेत्रींचा चेहराच नाही तर ब-याच गोष्टींमध्ये साम्य आढळतं. धकधक गर्ल जेव्हा हसते तेव्हा तिचं हसणं अगदी मधुबाला यांच्याप्रमाणेच भासतं. मधुबाला यांच्याप्रमाणेच माधुरीही उत्तम अभिनेत्री आणि नृत्यातही पारंगत आहे. दोघींमध्येही खास नजाकत पाहायला मिळते. त्यामुळं धकधक गर्ल माधुरीला आजच्या जमान्याची मधुबाला असंही म्हटलं जातं. ऐश्वर्या राय बच्चन आणि स्नेहा उल्लाल सलमान खान आणि स्नेहा उल्लाल यांच्या लकी या सिनेमाचा प्रोमो पहिल्यांदा रसिकांसमोर आला त्यावेळी सलमान आणि ऐश्वर्या-राय बच्चन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र नंतर लगेचच स्पष्ट झालं की प्रोमोमध्ये झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या नसून नवोदित स्नेहा उल्लाल आहे. ऐश्वर्या आणि स्नेहा यांच्या चेह-यात इतकं साम्य आहे की त्यावेळी रसिकसुद्धा फसले. लकी सिनेमा पाहताना अनेक सीन्समध्ये स्नेहा नसून ऐश असल्याचाच भास होतो. कॅटरिना कैफ आणि झरीन खान बॉलिवुडची अभिनेत्री झरीन खान हिची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तिचं अभिनेत्री कॅटरिना कैफसारखं हुबेहूब दिसणं. वीर या सिनेमातून झरीननं सलमानसह रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. कॅटसारखी दिसत असल्यानंच सलमाननं झरीनला या सिनेमात संधी दिल्याच्या चर्चा रंगल्या. कॅटरिनाचा दणकट अवतार म्हणूनही झरीनकडे पाहिलं जातं. श्रीदेवी आणि दिव्या भारती अभिनेत्री श्रीदेवी आणि दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती यांच्या चेह-यातही कमालीचं साम्य पाहायला मिळतं. दोघींचा अभिनय, नृत्य तर दमदार होतंच. मात्र त्यांच्या चेह-यात, हसण्यातली समानता कुणालाही चटकन लक्षात येईल अशीच होती. स्मिता पाटील आणि चित्रांगधा सिंग बॉलिवुडची डस्की अभिनेत्री असा ज्या अभिनेत्रीचा उल्लेख होतो ती अभिनेत्री म्हणजे चित्रांगधा सिंग. बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांची चित्रांगधा ही कार्बन कॉपी असल्याचं बोललं जातं. दोघींच्या चेह-यात बरीचशी समानता आहे. इतकंच नाही तर चित्रांगधाचा अभिनयसुद्धा स्मिता पाटील यांच्यासारखा असल्याचंही बोललं जातं. त्यामुळं स्मिता पाटील यांच्यासारखं दिसण्यापासून ते अभिनयापर्यंत झालेली ही तुलना चित्रांगधासाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावी लागेल. हृतिक रोशन आणि हरमन बावेजा कहो ना प्यार है सिनेमातून अभिनेता हृतिक रोशननं हिंदी चित्रपटसृष्टीत दणक्यात एंट्री मारली. अल्पावधीतच अभिनय आणि डान्सनं हृतिकनं रसिकांची मनं जिंकली. एकामागून एक हिट सिनेमांची नोंद हृतिकच्या नावावर झाली. त्यामुळंच की काय हृतिकची लोकप्रियता कॅश करण्यासाठी त्याच्या सारखाच दिसणारा एक अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरला. हृतिकसारखा हुबेहूब चेहरा दिसावा यासाठी त्यानं आपल्या चेह-यावर सर्जरी केल्याचंही बोललं गेलं. हा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा. हृतिक आणि हरमनच्या चेह-यात बरंच साम्य पाहायला मिळतं. मात्र हे साम्य नैसर्गिक नसून हरमननं ते घडवून आणल्याच्या चर्चाच जास्त रंगल्या.