Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी व्यक्तीचा विरोध करणार- विक्रम गोखले

By admin | Updated: October 9, 2016 22:44 IST

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी पाक कलाकारांची बाजू घेणा-यांना जोरदार चपराक लगावली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी पाक कलाकारांची बाजू घेणा-यांना जोरदार चपराक लगावली आहे. ते म्हणाले, "उरीला झालेल्या हल्ल्यानंतर आपला देश पाकिस्तानी दहशतवाद्यांना युद्ध पातळीवर लढा देत आहे. सध्याच्या परिस्थितीत मी पाकिस्तान आणि कुठल्याही पाकिस्तानी व्यक्तीचा विरोधच करणार आहे. पाकिस्तानी चाहत्यांना माझ्या या विचारांमुळे माझ्याबद्दल राग येत असेल तर गेले उडत. पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लोकांची बाजू घेणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीचा मला तिटकारा वाटतो, भले तो एखादा नेता, कलाकार असो किंवा कोणीही असो", असं म्हणत विक्रम गोखलेंनी पाक कलाकारांची बाजू घेणा-या कलाकारांवर टीकास्त्र सोडले आहे. "माझ्या हातात असते तर असल्या लोकांना मी चौकात उभे करून देशद्रोही वृत्तीसाठी सगळ्यात कडक शिक्षा दिली असती. प्रत्येक भारतीय ज्याला देशाबद्दल प्रेम आहे तो माझा आहे, मग त्याचा धर्म, जातपात काहीही असो. तो भारतीय आहे आणि त्याला देशाबद्दल प्रेम आहे म्हणून तो माझा आहे", असे ते म्हणाले आहेत. "ज्या मूर्खांनी आपल्या देशाच्या विरोधात आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लोकांच्या बाजूने मीडियामध्ये बडबड केली आहे, त्यांचा मला प्रचंड राग आहे. त्यातले काही जण दुर्दैवाने माझे सहकारी पण आहेत. त्यांच्याबद्दलचे माझे विचार ऐकून ते ह्यापुढे माझ्याबरोबर काम करणार नसतील तर तेही गेले उडत. मला काहीही फरक पडत नाही. मीच असल्या लोकांबरोबर काम करणार नाही. मी प्रथम भारतीय आहे आणि भारतासाठी आहे", असं विधान करून पाक कलाकारांवर घातलेल्या बंदीचं जोरदार समर्थन केलं आहे. तसेच सलमान खान, करण जोहर सारख्या पाक कलाकारांची बाजू घेणा-यांवरही शरसंधान साधलं आहे.