ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूगांत शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त आता लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. युएईत पुढच्या वर्षी होणा-या मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये (एमसीएल) संजय दत्त स्वत:च्या मालकीचा संघ उतरवणार असल्याचे वृत्त आहे.
बेकायदेशीर रित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगावास भोगणा-या संजयची शिक्षा पुढील वर्षी संपणार असून त्यानंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे. त्याच वर्षी युएईत निवृत्त क्रिकेटपटू सहभागी होणारी एमसीएल स्पर्धा रंगणार आहे. संजयच्या अनुपस्थिीत त्याची पत्नी मान्यता त्याचे सर्व व्यवहार सांभाळत असून तिनेच एमसीएलशी करार केला आहे . संजय तुरूंगाबाहेर पडेपर्यंत एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी त्याचे व्यवहार सांभाळणार असल्याचेही समजते. एमसीएलमध्ये ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाघ सारखे खेळाडू सहभागी होणार आहेत.
अन्य भारतीयांप्रमाणेच आम्हालाही क्रिकेटची आवड असून आम्ही त्याबाबत पॅशनेट आहोत. त्यामुळेच आम्ही संघ खरेदी करण्याचा निर्णय घेतला असे सांगत मान्यताने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.