Join us  

"सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्यांनी...", आदेश बांदेकरांनी सांगितली नितीन देसाईंची खास आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 2:39 PM

Nitin Desai : नितीन देसाईंबद्दल बोलताना आदेश बांदेकर भावुक

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्टला आत्महत्या केली. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हळहळली. ४ ऑगस्टला नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मराठी व हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली. आदेश बांदेकरही त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.

लोकमत फिल्मीशी बोलताना आदेश बांदेकरांनी नितीन देसाईंची खास आठवण शेअर केली. नितीन देसाईंबद्दल बोलताना ते भावुक झालेले होते. “कलाक्षेत्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत नितीन देसाईंनी योगदान दिलं. ते कोणीही नाकारू शकत नाही. एका मराठी कलावंताने त्याच्या स्वप्नासाठी झपाटून काम केलं. त्यांच प्रत्येकाशी असलेलं नातं वेगळं होतं. त्याला दादा म्हणायचे. खरं तर मनोरंजन क्षेत्रातील तो दादाच होता. त्याने त्याच्या कामाने हे दादापण सिद्धही केलं. आणि म्हणूनच नितीन देसाई या नावाकडे जगभर आदराने बघितलं गेलं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना मी ईश्वराकडे करेन,” असं ते म्हणाले.

“आम्ही दोघेही पवईत राहायचो. अनेकदा त्याच्याकडे पाहुणे आल्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्यांचा फोन यायचा. काही महिन्यांपूर्वी ते फार व्यस्त होता. मी दर्शनाला येतो, आपण भेटुया असं तो मला म्हणाला होता. असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये. त्याने नेहमी केवळ आनंदच शेअर केला. त्याच्या आयुष्यात एवढं दु:ख आहे, हे त्याने कळूच दिलं नाही,” असं पुढे बांदेकरांनी सांगितलं.

नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचे सेट उभारले होते. ‘जोधा अकबर’, ‘देवदास’, ‘अजिंठा’, ‘लगान’ असा सुपरहिट सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होतं. कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं देसाईंच्या पत्नीचं म्हणणं आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीने खालापूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईआदेश बांदेकर