Join us  

"हॅपी बर्थडे बाबा", निळू फुले यांच्या वाढदिवशी लेक गार्गी फुले यांची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 1:23 PM

Nilu Phule Birthday : "तू जिथे असशील...", वडील निळू फुले यांच्या वाढदिवशी गार्गी फुलेंची खास पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे निळू फुले. अनेक सिनेमांत खलनायकाची तगडी भूमिका साकारुनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. उत्कृष्ट अभिनय करत केवळ खलनायकच नव्हे तर इतर विविधांगी भूमिकाही त्यांनी लिलया पेलल्या. 'सिंहासन', 'पिंजरा', 'गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं', 'सामना', 'फटाकडी', 'प्रतिकार' अशा अनेक सिनेमांमध्ये काम करून त्यांनी वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. म्हणूनच आज ते आपल्यात नसले तरीही प्रेक्षकांच्या मनात त्यांची छबी आजही कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ कलावंताचा आज वाढदिवस आहे. 

निळू फुले यांच्या वाढदिवशी त्यांची लेक गार्गी फुले यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. गार्गी फुले यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन निळू फुले यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. वडिलांच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करताना त्या भावुक झाल्या आहेत. "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा...तु जिथे असशील तिथे खूप खूप प्रेम", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. 

गार्गी फुले थत्ते यांनीदेखील वडिलांचा वसा पुढे चालवला. घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या गार्गी या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी 'तुला पाहते रे', 'राजा राणीची गं जोडी', 'शुभविवाह', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर कलर्स वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेतून त्या सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. निळू फुले यांचे जावई ओंकार थत्तेदेखील इंद्रायणी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. 

टॅग्स :निळू फुलेगार्गी फुलेमराठी अभिनेता