Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रूपात येणार "हम पाँच" मालिका

By admin | Updated: June 21, 2017 12:54 IST

हम पाँच ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला एका नव्या रूपात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21- गेल्या काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘हम पाँच’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.  या मालिकेतील प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही केलं.  विशेष म्हणजे अभिनेत्री विद्या बालन हिने या मालिकेच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवर काम केलं होतं. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला ही मालिका एका नव्या रूपात येणार आहे. या मालिकेतील भूमिकांसाठी अनेकांचे ऑडिशन घेण्यात आले आणि त्यातून निर्माते-दिग्दर्शकांनी काही जणांची निवड केली आहे.
 
मिडल क्लास माथूर जोडपं आणि त्यांच्या पाच मुलींची कथा आधीच्या मालिकेत होती. आताही त्याच प्रकारच्या कथेवर ही नवी मालिका असेल. ‘हम पाँच फिर से’ असं या मालिकेचं नाव असणार आहे. ‘नव्या रूपात येणारी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज आहे. मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल तसंच लोकांच्या चेहऱ्यावर हास्यही आणेल. या नव्या मालिकेचा मी एक भाग असल्याचा मला आनंद आहे, असं मत मालिकेत काम करणाऱ्या जयश्री व्यंकटरामनन यांनी म्हंटलं आहे.
 
हम पाँचच्या मागील दोन सिझनची निर्मिती एकता कपूरने केली होती. पण या तिसऱ्या सिझनची निर्मिती  ‘एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स’ करणार आहे.  यावेळी मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 1995 आणि 2005 मध्ये प्रचंड गाजणाऱ्या या मालिकेचं नवीन रूप कसं असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 
 
मागील सिझनमध्ये अशोक सराफ यांनी आनंद माथूर यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका आता अभिनेता सूरज थापर साकारणार आहे. तर आनंद माथूर यांच्या पत्नीची भूमिका बैष्णकी महंत साकारणार आहे. आधी ही भूमिका प्रिया तेंडुलकर यांनी साकारली होती. तर दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत  सीमा पांडे दिसतील. काजल भाईच्या भूमिकेत जयश्री व्यंकटरामनन दिसणार आहे. विद्या बालनने बजावलेली राधिकाची भूमिका आता नव्या सिझनमध्ये अंबालिका सप्रा साकारणार आहे.