Join us

नसिरुद्दीन शहा यांनी दिले मिलिंदला ‘सरप्राइज’

By admin | Updated: August 5, 2016 02:21 IST

भारदस्त आवाज, अनोखी अभिनय शैली आणि प्रखर व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले

भारदस्त आवाज, अनोखी अभिनय शैली आणि प्रखर व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण तुम्ही म्हणाल की, मिलिंद शिंदे आणि नसिरुद्दीन शहा यांचा काय संबंध? तर नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये नसिरुद्दीन शहा अनेक वर्षांपासून अभिनयाचे प्रशिक्षण देत आहेत. अनेक दर्जेदार अभिनेत्यांना नसिरुद्दीन शहांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे. नुकताच मिलिंद शिंदेच्या मोबाइलवर एक आॅडिओ मेसेज आला. तो कुणी पाठवला हे त्याला काहीच कळेना. तो मेसेज ऐकल्यावर समजले की त्यातील आवाज नसिरुद्दीन शहांचा होता. हा आॅडिओ मिलिंद शिंदेंनी सीएनएक्ससोबत शेअर करून नसिरुद्दीन शहांच्या आठवणींना उजाळा दिला. साक्षात आपल्या गुरूंनी आपले कौतुक केले यासारखा दुसरा आनंद नाही. मी माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन सरांना क्रेडिट देतो हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी एक आॅडिओ मेसेज रेकॉर्ड करून मला पाठवला. ते म्हणाले, ‘आतापर्यंत २०० विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले, पण तू या सर्वांमध्ये नेहमीच वेगळा आहेस. तुझ्या कामाचे संपूर्ण श्रेय हे फक्त तुझेच आहे.’ मी एनएसडीमध्ये तिसऱ्या वर्षात असताना नसिरुद्दीन सर आम्हाला शिकवायला होते. त्यांना पाहून मला प्रचंड आनंद झाला होता. मी ज्यांच्यासाठी एनएसडीला अ‍ॅडमिशन घेतले तेच समोर दिसल्यावर मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पहिल्याच लेक्चरला प्लीज फरगेट दॅट आय अ‍ॅम अ फिल्म स्टार हे त्यांचे वाक्य आजही मला आठवते. नगरमधील छोट्याशा गावातून आलेला मी आज जे काही आहे ते फक्त नसिरुद्दीन सरांमुळेच. खरंच आहे म्हणा, गुरूंनी त्यांच्या शिष्याला दिलेले हे एक अविस्मरणीय सरप्राइजच होते.