ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी ही नंदिता वहिनी लवकरच ‘निखिल फिल्म्स’ प्रस्तुत ‘ब्रेव्हहार्ट’ जिद्द जगण्याची या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
अनेक मालिका व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील निगेटिव्ह भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली. ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात तिची वेगळी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी निर्मित ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन दासबाबू यांनी केलंय. धनश्री काडगांवकर ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ याच्यासोबत झळकणार आहे. धनश्री, संग्राम सोबत अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु.अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर, प्रदिप भिडे आदी कलाकार यात एकत्र आले आहेत. सत्यघटनेवर आधारित ‘ब्रेव्हहार्ट’ ची पटकथा-संवाद व गीते श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून अर्नब चटर्जी यांनी संगीत तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिलं आहे.
‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटातील धनश्रीच्या भूमिकेची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही; कारण ‘ब्रेव्हहार्ट’ येत्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.