Join us

मुंबई पोलिसांनी वाढवली सोनू निगमची सुरक्षा

By admin | Updated: April 19, 2017 10:39 IST

मशिदीवर भोंग्यामुळे झोप मोड होते, असे वादग्रस्त ट्विट करणारा बॉलिवूडचा गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - मशिदीवर भोंग्यामुळे झोप मोड होते, असे वादग्रस्त ट्विट करणारा बॉलिवूडचा गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्या घराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. 
"मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे 17 एप्रिल रोजी उपस्थित केला होता. 
 
तर दुसरीकडे, मंगळवारी रात्री सोनूनं पुन्हा ट्विट केले होते. जे कुणी असे म्हणत आहेत की मी केलेले ट्विट्स मुस्लिमविरोधी आहेत, तर त्यांनी एक तरी जागा दाखवावी, जेथे मी मुस्लिमविरोधी ट्विट केले आहे. मी त्याबाबत माफी मागेन.
 
(मशिदींवरील भोंग्यांविरोधात सोनू निगमचा बिगुल)
हे ट्विट करण्यापूर्वी सोनूनं आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्टीकरण देणारे ट्विट केले होते.  "मस्जिद किंवा मंदिरांवर भोंगे लावण्यावर परवानगी मिळू नये, असे सोनूने नव्याने ट्विट केले. त्यामुळे "भोंगे" या विषयावर यावर सध्या सोशल मीडियामध्ये लाउड चर्चा सुरू आहे.   
(सोनू निगमविरुद्ध गोवंडीत आंदोलन)
सोनू निगमच्या या ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.  "नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. अत्याधुनिक युगात नमाजासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही", असे परखड मत पटेल यांनी मांडले.   
 
यावर  "समजूतदार व्यक्ती अशा प्रकारे मुद्दा समजून घेतात. तुमचा आदर आहे अहमद पटेल जी. अजान किंवा आरतीचा नाही तर हा मुद्दा भोंग्याचा आहे," अशी प्रतिक्रिया सोनूनं दिली.
(ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला)
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते.  "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता.  या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले. 
 
दरम्यान, मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा जारी केला आहे. एवढंच नाही तर सोनूला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली आहे.  
 
गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे.