लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या चित्रपटातून अनेक ज्वलंत विषय मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा असाच काळजाला भिडणारा विषय घेऊन प्रवीण तरडे चित्रपट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर सगळेच बोलतात; परंतु त्यांच्या मुलांच्या संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीच करीत नाही. स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनी हातून गेल्यावर नैराश्याने किंवा सूडाच्या भावनेने पेटलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची गोष्ट मांडणारा ‘मुळशी डॉट कॉम’ चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. १९९०-९२ च्या काळात मुळशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आयटी पार्क, एमआयडीसी, हिल स्टेशन उभारण्यासाठी काही जणांना त्यांच्या जमिनी विकल्या. त्या वेळी भरमसाट दागिने, गाड्या, मुलींची लग्ने थाटामाटात या शेतकऱ्यांनी केली; परंतु जसा पैसा आला तसाच तो झटक्यात गेलाही. कालांतराने या शेतकऱ्यांची मुले मोठी झाली आणि आपल्या शेतजमिनी आपल्याला फसवून कोणी तरी बळकावल्याचा राग त्यांच्या मनात निर्माण झाला. मग राजकीय पक्षांचे नेते, आयटी, सरकार यांच्याविरोधात असलेल्या रागाचे रूपांतर गुन्हेगारीत झाले. गुन्हेगारीकडे वळलेल्या शेतकऱ्यांच्या ५ मुलांची गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. यामधील सर्वच कलाकार नवीन आणि रंगभूमीवर काम करणारे असल्याचे प्रवीण तरडे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. एवढेच नाही, प्रवीण तरडे स्वत: सिनेमात गुन्हेगाराची भूमिका साकारणार असल्याचा त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना सिनेमात प्रवीण तरडे यांचे सिक्स पॅक अॅबदेखील पाहायला मिळतील.
शेतकऱ्यांच्या संवेदना मांडणार मुळशी डॉट कॉम
By admin | Updated: September 25, 2016 03:16 IST